मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात चाकूचा धाक दाखवून महिलेवर बलात्कार करून गुप्तांगाव वार करणाऱ्या नराधम आरोपीला राजगुरुनगर सत्र न्यायालयाने 7 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. संजय पंडित भोसले (रा. कोळगाव शिवार ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात तीन अनोळखी चोरट्यांनी रात्रीच्या वेळी महिलेच्या घरात प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून त्यांच्यापैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिच्या गुप्तांगावर चाकूने वार करत अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी तपासाची चक्रे फिरवत एका आरोपीला अटक करून त्याची ओळख परेड घेतली. फिर्यादीने आरोपी संजय भोसले याला ओळखले होते. सदर गुन्ह्यात नमूद आरोपी विरुद्ध सत्र न्यायालय राजगुरुनगर येथे दोषारोपपत्र पाठविण्यात आले होते. त्यामध्ये सरकारी वकील विकास देशपांडे यांनी सर्व कामकाज पाहिले. नऊ साक्षीदार तपासण्यात आले.
फिर्यादी महिला तसेच भौतिक पुराव्याच्या आधारे आरोपीने केलेला गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. त्यानंतर न्यायाधीश एस.पी. पोळ यांनी सदर आरोपीस गुन्ह्यात दोषी धरून भादवि कलम 380 अन्वये पाच वर्ष आणि भादवी कलम 457 अन्वये सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा एकदाच भोगावयाच्या आहेत.
सदर न्यायालयीन कामकाज उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, कोर्ट अमलदार सुनीता बटवाल यांनी पाहिले असून आरोपीविरुद्ध पुरावा गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश धस व दप्तरी सोमनाथ वाफगावकर यांनी सादर केले आहे. आरोपी कारागृहामध्ये बंद आहे.