लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे तेलाच्या टँकरमधून गांजाची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तब्बल 3 क्विंटल गांजासह 1 कोटी 9 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 2 किलो गांजासह दोघांना अटक करण्यात आली होती. अमोल ज्ञानोबा गोरे (रा . वडवळ नागनाथ ता . चाकूर) व एक महिला आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली असताना त्यांनी जप्त केलेले गांजाचे पॅकेट सॅम्पल असल्याचे सांगितले. हे सॅम्पल लातूर, नांदेड, नाशिक येथे गांजा विकणाऱ्या लोकांना दाखवण्यासाठी असून उर्वरित गांजा एका तेलाच्या टँकरमध्ये आहे. हा गांजा विशाखापट्टणम येथून देगलूरमार्गे उदगीर येथे आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ही माहिती मिळताच पोलिसांनी हाकनकवाडी शेत शिवारामध्ये एका शाळेमागे उभा असलेल्या टँकर (क्र. एम एच 46/ए आर 0659) जप्त केला. या टँकरमध्ये पोलिसांना गांजाची 3 क्विंटल 2 किलो वजनाची 14 पोती आढळली. यासह पोलिसांनी टँकर आणि कार असा एकूण 1 कोटी 9 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. टँकर चालक अमोल गोरे याच्यासोबत लहू आलुरे, सचिन आलुरे, कैलास बेंडके (सर्व रा. वडवळ नागनाथ ता . चाकूर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार फुलारी, पोलीस उपनिरीक्षक सुनील भिसे, गणेश कदम, रवींद्र तारु परशुराम देवकते, आयुब शेख, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, संतोष शिंदे, प्रदीप घोरडे, राहुल नागरगोजे, अंगद कोतवाड, नामदेव चेवले, महबूब सय्यद, भीमाशंकर फुलारी, अभिजीत लोखंडे, राम बनसोडे, निजामुद्दीन मोमीन, तुकाराम कज्जेवाड, अर्जुन तिडोळे, जुल्फेकार लष्करे, तांत्रिक सहाय्य पोलीस अंमलदार संतोष देवडे, गणेश साठे यांनी ही कामगिरी केली.