संगमनेरातील ‘गोंधळ मिसळ’मध्ये गोंधळ! पोलिसांचा छापा; पोरा-पोरींची झाली पळापळ

शहरात पडद्याआडचे ‘कॅफे कल्चर’ वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग सुरू आहेत. अशा बेकायदेशीर कॅफेंमधून अल्पवयीन मुलींसह युवतींवरदेखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेकायदेशीर कॅफे चालविणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत असले, तरी संगमनेरात असे ‘उद्योग’ सुरूच असल्याचे उघड होत आहे.

संगमनेर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या गणेशनगर परिसरातील ‘गोंधळ मिसळ’ या कॉफी शॉपमधील एका छुप्या कॅफेवर पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला आणि त्या ठिकाणी पडद्याआड, लाकडी प्लायवूड कम्पार्टमेंटच्या आडोशाला चाळे करीत असलेल्या जोडप्यांची एकच पळापळ झाली. पोलिसांनी या बनावट कॅफेत प्रवेश करताच काही पोरा-पोरींनी तेथून धूम ठोकली, तर काही पोलिसांच्या हाती लागले.

सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांना अशा पद्धतीने बेकायदेशीर उद्योग सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ यांच्यासह महिला पोलीस ताई शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी ‘गोंधळ मिसळ’ कॅफेमध्ये छापा घातला.

पोलिसांची चाहूल लागताच त्या ठिकाणी असलेल्या जोडप्यांमधील काही मुले आणि मुली पळून जाण्यात यशस्वी झाले. ‘गोंधळ मिसळ’च्या वरच्या मजल्यावर प्लायवूडचा वापर करून वेगवेगळे कम्पार्टमेंट करण्यात आलेले आढळून आले. त्यात काही मुले व मुली अश्लील चाळे करीत असताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी तंबी दिली. या कम्पार्टमेंटला गडद रंगाचे पडदे लावण्यात आले होते. आतमध्ये बसण्यासाठी टेबल्स ठेवलेले दिसून आले. कॉफी शॉप असले, तरी त्याचा परवाना नव्हता. शिवाय कॉफी बनविण्याचे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. पकडलेल्या प्रेमीयुगुलांना पोलिसी भाषेत समज देण्यात आली.

याप्रकरणी कॅफेवर काम करणाऱ्या दौलत बन्सी खाडे (वय 42, रा. रंगार गल्ली, संगमनेर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॅफेच्या मूळ मालकाला बोलाविण्यात येऊन चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली, हे मात्र गुलदस्त्यात आहे.