लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज, कोकणाच्या विकासासाठी मविआला निवडून द्या – जयंत पाटील

राज्यातील महायुती सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सरकारच्या कार्यकाळात राज्यात शेतकरी, विद्यार्थी, युवक त्रस्त आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आज शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जयंत पाटील बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी सुरेश दळवी भाई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या शिवस्वराज्य यात्रेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र नेहमी लढणाऱ्यांच्या बाजूने उभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील जनतेत चेतवलेले स्फुलिंग आजपर्यंत जागं आहे. त्यामुळे महाराजांचा पुतळा उभारण्यात झालेला भ्रष्टाचार कधीच मान्य केला जाणार नाही. त्याचं प्रायश्चित्त अटळ आहे. कार्यकर्ता जपण्याची परंपरा या मतदारसंघाने पहिली आहे. मात्र मागच्या काही वर्षात याला ग्रहण लागले आहे. ते मोडून काढण्याची जबाबदारी आपली आहे, असे जयंत पाटील पुढे म्हणाले.

सध्याचे महायुती सरकार हे महाराष्ट्राचं नाव खराब करतंय अशी खंतही यावेळी प्रदेशाध्यक्षांनी बोलून दाखवली. संपूर्ण महाराष्ट्रातील महिला सुरक्षित नाहीत. नुकतंच देवगड येथे एक तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. खरंतर लाडकी बहीण नाही तर ‘सुरक्षित बहीण’ ही काळाची गरज ठरली आहे. आपण सर्वांनी त्यासाठी आग्रहाने मागणी केली पाहिजे, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात शालेय गणवेश प्रकरणातील भ्रष्टाचारावरही भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या गणवेशामध्ये 1700 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आता समोर आला आहे. याचा लाडका कंत्राटदार जळगावात बसला आहे. अर्ध शैक्षणिक वर्ष संपलं तरीही अद्याप काही शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही, अशा शब्दात जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्याप्रमाणे पर्यटनाचा विकास व्हायला हवा होता तसा विकास झालेला नाही. काजू, आंबा या फळांना आधारभूत किंमत मिळत नाही. कोकण रेल्वेच्या सुविधा वाढल्या नाहीत, नवीन स्टेशन झाले नाहीत, असेही म्हणत स्वाभिमानी कोकणवासियांनी महाविकास आघाडीला आशीर्वाद द्यावा असे आवाहन जयंत पाटील केले.

महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीसमोर झुकू द्यायचा नाही – डॉ. अमोल कोल्हे

महाराष्ट्राचा स्वाभिमान आपल्याला दिल्लीसमोर झुकू द्यायचा नाही, असे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेत बोलताना केले आहे. अमित शहा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगतात की आणखी पक्ष फोडा. याचा अर्थ त्यांनी मान्य केलंय की ज्यांना फोडलंय ते काहीच कामाचे नाहीत. लोकसभेनंतर ‘गड आला पण सिंह गेला’ अशी भावना निर्माण झाली होती, त्याचा वचपा आपल्याला विधानसभेत काढायचा आहे, असेही अमोल कोल्हे म्हणाले.