महाराष्ट्रात सणउत्सवांचे वातावरण असताना मात्र एनआयए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे. शनिवारी पहाटेपासूनच पाच राज्यांमध्ये छापे टाकायला सुरुवात केली आहे. दहशतवादी कृत्यात समावेश असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयए टीमने जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, यूपी, आसाम आणि दिल्लीमध्ये हे छापे टाकले आहेत.
एनआयची टीम शुक्रवारी रात्री ईशान्य दिल्लीच्या मुस्तफाबाद भागात छापे टाकण्यासाठी पोहोचली होती. एनआयएसोबतच दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि इतर पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. मुस्तफाबादमध्ये ज्या ठिकाणी छापा टाकण्यात आला त्या ठिकाणाहून अनेक संशयास्पद वस्तू सापडल्या आहेत. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीनंतर एनआयएने काही लोकांना नोटीस बजावली असून 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने कारवाईदरम्यान महाराष्ट्रातील जालना, औरंगाबाद आणि मालेगाव येथेही छापे टाकले. या ठिकाणांहून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. जालना येथून 2, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव येथून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एनआयएच्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सांगरी आणि इतर काही भागात छापे टाकले. तसेच आसाम उत्तर प्रदेशातही छापे टाकण्यात आले आहेत. ही कारवाई अजूनही सुरू आहे. सांगरी कॉलनीतील मौलवी इक्बाल भट यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तेसच इतर भागातील संशयितांच्या घरी ही छापेमारी सुरू आहे. मात्र, येथून कोणालाही ताब्यात घेतल्याचे वृत्त नाही.