अभिप्राय  – एक अव्यक्त कहाणी

>> अ‍ॅड जुई पालेकर-परळीकर

‘डार्क हॉर्स’ या हिंदीमधील लोकप्रिय कादंबरीमध्ये नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱया उमेदवारांच्या जीवनाचे थेट व ज्वलंत चित्रण केंद्रित झाले आहे. देशातील सर्वाधिक आव्हानात्मक परीक्षेची तयारी करणारा उमेदवार केवळ महत्त्वाकांक्षीच नसतो तर या सर्वोच्च परीक्षेच्या अभ्यासाच्या निमित्ताने बहुआयामी जीवनशैली आणि स्व-संघर्षात असतो. याच संघर्षाची ही कहाणी आहे. खेडय़ातून बाहेर पडून मुखर्जी नगर, दिल्लीच्या पार्श्चभूमीवर शहरी जीवनाचा सामना करणाऱया उमेदवारांच्या मानसिक कोंडीला वाचा फोडणाऱया या कादंबरीला 2015 चा साहित्य अकादमी युवा पुरस्कारही मिळाला आहे.

युवा लेखक निलोत्पल मृणाल यांचे हे पुस्तक स्वानुभवांवर आधारित आहे. आयएएस परीक्षेच्या तयारीसाठी वेगवेगळय़ा राज्यातून आलेल्या निम्नवर्ग ते मध्यमवर्गीय कुटुंबातील या विद्यार्थ्यांना कोणत्या संघर्षांचा सामना करावा लागतो आणि त्याची मानसिक स्थिती कशी असते हे सारे काही या पुस्तकात आले आहे. दिल्लीतील मुखर्जी नगर येथे घडणारी ही कथा, जिथे भविष्यात आयएएस / आयपीएस अधिकारी बनविण्याच्या निश्चित दाव्यासह विविध संस्था सज्ज आहेत.

त्यांच्या भिंती अशाच होर्डिंग्जने सुशोभित केल्या गेल्या आहेत आणि यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची चित्रे त्या संस्थांच्या प्रशिक्षण तंत्राबद्दल अभिमान बाळगताना दिसतात. पुस्तकातील पात्रांचे संवाद, त्यांची अभिव्यक्ती आणि आयएएस उमेदवार म्हणून अंतर्बाह्य बदललेली वृत्ती खरोखर हृदयस्पर्शी आहे. जो कोणी अशा आयुष्यातून गेला आहे किंवा असे विद्यार्थीजीवन जगला आहे तो वाचक अगदी सहजरीत्या कथेशी जोडला जातो. कथेला वेग तर आहेच पण सादरीकरणही स्तुत्य आहे.

लेखकाने कथा विद्यार्थांच्या जीवनापुरती मर्यादित ठेवलेली नाही तर त्यांचे पालक आणि घरांची पार्श्वभूमीदेखील दर्शविली आहे. खरेतर कादंबरीतील सर्वांत जिवंत आणि अनोखे क्षण तिथेच मिळतात. डार्क हॉर्समध्ये या साऱया विद्यार्थ्यांची स्वप्ने आहेत, जबाबदाऱयांची त्यांना असलेली जाणीव आहे. त्यांच्या घर आणि गावाकडील ठसठशीत आपुलकीचा नाटय़मय गोडवा आहे. औषधोपचारांकरिता गावावरून आलेले आणि पूर्ण दिल्ली फिरून पाहणारे मनोहरचे काका हे याचे उदाहरण आहे. या नाटय़मय संहितेत यूपी आणि बिहारच्या गावातील गरीबी आहे आणि त्या गरीबीतून वर येऊ पाहत पुढील पिढय़ांचा उद्धार करण्याचा उत्साहसुद्धा आहे. वाचकांचं निखळ मनोरंजन करण्याबरोबरच ही कादंबरी त्यांना नागरी सेवा परीक्षेकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देते. त्याचबरोबर ही कलाकृती उत्तर भारतीय जनजीवनाचं वेधक वर्णन वाचकांसमोर उलगडते.

डार्क हॉर्स
 लेखक : निलोत्पल मृणाल
 अनुवादक : डॉ. सतीश श्रीवास्तव
 प्रकाशक : साकेत प्रकाशन, छत्रपती संभाजीनगर
 किंमत : रु. 200 /-