सरन्यायधीश धनंजय चंद्रचूड हे कडक स्वभाव आणि शिस्त पाळण्याबाबत ओळखले जातात. नुकतेच चंद्रचूड एका वकिलावर प्रचंड संतापले. आदेश नसतानाही बदल सुचवणाऱ्या वकिलाला त्यांनी धारेवर धरले.
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे गुरुवारी न्यायालयाची शिस्त मोडणाऱ्या एका वकिलावर प्रचंड संतापले. एका प्रकरणात वकिलाने याचिका दाखल केली होती. त्यावर सीजेआय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. कोर्टाने आदेश डिक्टेट केला होता. पण त्यावर अद्याप न्यायमूर्तींच्या सह्या झालेल्या नव्हत्या. त्याच वेळी वकील खंडपीठासमोर आला आणि आदेशात बदल सुचवू लागला. हे पाहून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला सुनावले. “तुम्हाला कसे कळले की काय आदेश दिला गेला आहे, कारण अजून तर न्यायमूर्तींनी सह्या केलेल्याच नाहीत”, असे सरन्यायाधीश म्हणाले.
कोर्ट मास्टरकडून माहिती घेण्याची तुमची एवढी हिंमत कशी झाली. मी न्यायालयात काय आदेश दिले होते. असे तर उद्या तू माझ्या घरी येशील आणि खासगी सचिवाला विचारशील मी नेमकं काय करत आहे. वकिलांना काही समज आहे की नाही? वकिलांनी काही तारतम्य राखले पाहिजे. थोड्या काळासाठी का होईना मात्र, सध्या ते न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. अशा कृती पुन्हा होता कामा नये, असे सरन्यायाधीश चंद्रचूड रागाने वकिलाला म्हणाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा कार्यकाळ 10 नोव्हेंबर रोजी समाप्त होणार असल्याने ते निवृत्त होत आहेत.