दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी असुरक्षित, पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांची टीका

पुण्यात एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. एक्सवर पोस्ट करून सुळे म्हणाल्या की, अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे?

बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणीही सुळे यांनी केली आहे.

कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटवर

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही बोपदेव घटनेप्रकरणी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था व्हेटिलेटरवर असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, बोपदेव घाटात घडलेली सामुहिक अत्याचाराची घटना महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. शाळा, कॉलेजे, रस्ते, हॉस्पिटल्स काहीही आज सुरक्षित राहिलेले नाहीत, परिणामी महाराष्ट्रात कधी नव्हती एवढी असुरक्षेची भावना आज पसरली आहे.

राज्यात कायदा-सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर पोहचली असताना राज्याचे गृहमंत्री मात्र धृतराष्ट्राप्रमाणे सत्तेच्या मोहात आंधळे होऊन महिला सुरक्षेच्या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. एकीकडे महिला सन्मानाच्या गोल गोल गप्पा करायच्या आणि दुसरीकडे मात्र शक्ती कायदा लागू करण्यासंदर्भात काहीच करायचं नाही ही दुटप्पी भूमिका योग्य नाही असेही पवार म्हणाले.