आमदार अपात्रतेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली, सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात मागील काही महिन्यांपासून तारीख पे तारीख सुरूच आहे. शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार होती, मात्र सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने काही कारणास्तव ती पुढे ढकलली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेबात दिलेल्या निर्णयाविरुद्ध शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी होणार होती. सीरिअल क्रमांक 33 वर ही याचिका सूचीबद्ध करण्यात आली होती. या सुनावणीमध्ये काय घडतेय, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान, ही याचिका पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.