‘बिग बॉस मराठी-5’ साठी हा शेवटचा अटीतटीचा आठवडा आहे. ‘बिग बॉस’च्या अंतिम फेरीपर्यंत कोणता सदस्य पोहोचणार आणि ‘बिग बॉस’ची ट्रॉफी कोण जिंकणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. परंतु सोशल मीडियावरील ‘गुलीगत फेम’ सूरज चव्हाण याने ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकावी आणि ती बारामतीला घेऊन यावी, असे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना वाटतेय. यासाठी त्यांनी सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सूरज चव्हाणला वोट करावे, असे जनतेला खास आवाहनसुद्धा केले आहे. ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीजन सूरज चव्हाणने जिंकावा असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह युगेंद्र पवार यांनीही सूरज चव्हाणचा एक फोटो शेअर करत त्याला वोट करण्याचे आवाहन केले आहे.
जय पवार यांचीही पोस्ट
सुप्रियांनी सूरज चव्हाणला मतदान करावे, असे आवाहन केले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनीही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हटले पोस्टमध्ये
बारामतीतील मोढवे गावचा सुपुत्र, रील्सस्टार सूरज चव्हाण ‘बिग बॉस’च्या घरात धुमापूळ घालतोय. देशभरात त्याची क्रेझ वाढतेय. ‘बिग बॉस’सारख्या अवघड रिऑलिटी शोमध्ये 174 लोकांमधून त्याची अंतिम 16 मध्ये निवड झाली आहे. ही बारामतीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे, असे म्हटले आहे.