मराठी भाषेला मिळाला अभिजात दर्जा, शिवसेनेच्या मागणीला अखेर यश

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

संत ज्ञानेश्वरांनी अशा शब्दांत वर्णन केलेल्या मराठी भाषेला आज मोठ्या संघर्षानंतर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात यासाठी विशेष प्रयत्न करून प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता. अखेर जबरदस्त प्रयत्न आणि मोठ्या संघर्षानंतर मराठी भाषेस अभिजात दर्जा बहाल करण्यात आला आहे. मराठीसोबत पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.

सुभाष देसाईंनी घेतली होती अमित शहांची भेट 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याप्रकरणी केंद्र सरकारने विलंब करू नये, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे, अशी ठोस भूमिका मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडली होती. त्यावर यामध्ये आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिले होते.

6 हजार पोस्टकार्ड

मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लिहिलेली तब्बल 6 हजार पोस्टकार्ड 2 मे 2022 रोजी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या हस्ते मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जमा करण्यात आली होती. ही पोस्टकार्ड राष्ट्रपतींकडे रवाना करण्यासाठी ती देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याचवेळी येत्या शैक्षणिक वर्षात तब्बल 25 हजार पत्रे जमा करून पाठवणार असल्याचा संकल्प युवासेनेने केला होता.