>> राजेश देशमाने
दुर्गा उत्सवात विधवांना सहभागी करून घेण्याच आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत मोताळा येथील जय दुर्गा उत्सव मंडळाने विधवा महिलेच्या हस्ते देवीची मूर्ती बसवून, नऊ दिवस नऊ विधवांच्या हस्ते देवीची पूजा, आरत्या, होम हवन व विधी करण्याचा संकल्प केला आहे. इतकेच नाही तर होणार्या सर्व कार्यक्रमांमध्ये सुवासिनी महिला विधवांना समानतेची वागणूक देण्याची व विधवा प्रथा न पाळण्याची शपथ घेणार आहे. तसेच विधवांच्या जीवनावर आधारित कीर्तनही आयोजित केले आहे. या ठिकाणी विविध म्हणी व फलक लावून विधवा महिलांना सन्मान दिला जाणार आहे. तसेच त्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला जाणार आहे. या मंडळाचा उपक्रम हा अनोखा उपक्रम ठरला आहे.
बुलढाण्यात प्रा. डी. एस. लहाने यांनी सामाजिक सुधारणेची अनोखी चळवळ सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी मानस फाउंडेशनची स्थापना केली व विधवा महिलांना न्याय देण्यासाठी विविध उपक्रम राबवून संपूर्ण राज्याच लक्ष वेधले. सध्या सर्वत्र दुर्गा देवीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा उत्सव साजरा करीत असताना सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाने विधवांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले होते. याला मोताळा मध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी विविध उपक्रम ठरविले आहे. त्यामध्ये नऊ दिवस विधवांच्या हस्ते आरती, देवीचे पूजन इतकेच नाही तर देवीची स्थापना ही विधवानीच केली आहे. या संदर्भात कीर्तनही आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष भूषण वानखेडे, प्रमोद कळस्कर यांनी दिली. हा उपक्रम सामाजिक सुधारण्याचे पाऊल ठरला आहे.
वटसावित्रीच्या पौर्णिमेला आम्ही केला निर्धार, अनिष्ट विधवा प्रथा गावातून करु हद्दपार, माझ्यासाठी नाही मी मुलांचा विचार करते, पुनर्विवाह झाल्यामुळे त्यांना परत बापाचे प्रेम मिळते. माझी आई माझा प्राण, परवरीश केली तिने छान. आता माझ्या लग्नात तीच करेल कन्यादान, एकाकी जीवनात मन नव्हते लागत पुनर्विवाह झाल्यामुळे पुन्हा आली जीवनात रंगत अशा आशयाचे अनेक फलक मानस फाऊंडेशन तर्फे दुर्गोत्सव स्थळी लावण्यात आले आहे. या मंडळाच्या अध्यक्ष माधुरी देशमुख, उपाध्यक्ष जीजा आसोलकर, सदस्य संगीत पारस्कर, साक्षी देशमुख, नंदा इंगळे, नंदा वानखेडे, पंचफुला किरोचे, ज्योती घडेकर, मंदा मोरे, मनोरमा सातव ह्या अथक परीश्रम घेत आहेत.