नवरात्रीच्या पहिल्या दिवशी श्रीअंबाबाई देवीची ‘सिंहासनारुढ श्रीमहालक्ष्मी’ रुपात बांधली पूजा

दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या करवीर नगरीत तोफेच्या सलामी नंतर विधिवत घटस्थापना करुन, आजपासून शारदीय नवरात्रौत्सवास मोठ्या पारंपरिक व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली.पहिल्या माळेला दुपारी करवीर निवासिनी श्रीअंबाबाई देवीची ” सिंहासनारुढ श्रीमहालक्ष्मी ” रुपात आकर्षक पूजा साकारण्यात आली. तर पन्हाळा तालुक्यातील श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर दख्खनचा राजा श्रीजोतिबाची नागवल्ली पानातील महापुजा बांधण्यात आली.

परंपरेनुसार सकाळी साडेआठच्या सुमारास तोफेची सलामी देऊन ,साडेतीन शक्तीपीठापैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात विधीवत घटस्थापना करण्यात आली. जुना राजवाडा परिसरातील जनतेसाठी खुले असलेल्या छत्रपतींच्या देव्हार घरातील श्रीतुळजाभवानी मंदिरात ही परंपरे -नुसार घटस्थापना करून नवरात्र उत्सवात सुरुवात झाली. यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत असलेल्या तीन हजारांहून अधिक मंदिरात आणि शहरातील नऊ दुर्गांच्या मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली. दिवसभर घराघरात घटस्थापना करण्यात कोल्हापूरकर मग्न होते. तर करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची रांग सकाळपासून रात्री उशिरापर्यंत उच्चांकी गर्दीने उसळून गेली होती.

श्रीजोतिबाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा

श्रीजोतिबा मंदिरात आज पहाटे घंटानाद करुन दरवाजे उघडण्यात आले. नित्य धार्मिक विधी नंतर घटस्थापनेनिमित्त श्रीजोतिबाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधली होती. सकाळी 9 च्या सुमारास श्री’चे पुजारी उंट, घोडे, देव सेवक यांच्या लवाजम्यासह धुपारती सोहळ्याला सुरवात झाली. मार्गावर ग्रामस्थांनी रांगोळी काढल्या.फुलांच्या पायघड्या घालून महिलांनी धुपारतीचे स्वागत करून औक्षण केले. धुपारती नंतर श्रीजोतिबा,श्रीकाळभैरव, श्रीमहादेव मंदीर,श्रीचोपडाई देवी,श्रीयमाईसह इतर सर्व मंदिरात विधिवत घट बसवण्यात आले. दिवसभर तेल अर्पण करून,जोतिबा दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. यावर्षी श्रीजोतिबाचा जागर आठव्या दिवशी गुरुवार दि.10 ऑक्टोबर रोजी होणार आहे.