इंदापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटणार या शक्यतेने भाजपचे नेते आणि या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार हर्षवर्धन पाटील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. अशातच हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. एवढेच नाही तर त्यांच्या मुलानेही व्हॉट्सअप स्टेटसवर ‘तुतारी’ चिन्ह ठेवले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. याच दरम्यान त्यांच्या मुलाने स्टेटसवर तुतारी चिन्ह ठेवले. त्यामुळे ते तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात यात किती तथ्य आहे हे उद्याच कळेल. शुक्रवारी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन पुढील रणनिती जाहीर करणार आहेत. त्यांनी तुतारी हाती घेतल्यास इंदापूरमध्येही अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होण्याची शक्यता आहे.