Jammu kashmir election- मतदान झालं, पण निकालाआधीच मृत्युनं गाठलं; भाजप उमेदवाराचं निधन

जम्मू-कश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक पार पडली. तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबर रोजी लागणार आहे. तत्पूर्वीच भारतीय जनता पक्षाला धक्का बसला असून माजी मंत्री आणि सुरनकोट मतदारसंघाचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी (वय – 75) यांचे निधन झाले. बुधवारी हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरनकोट मतदारसंघातून दोन वेळा विधानसभेवर गेलेल्या बुखारी यांनी फेब्रुवारी महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना विधानसभेचे तिकीटही मिळाले. 25 सप्टेंबर रोजी येथे मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच बुखारी यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

दरम्यान, बुखारी यांच्या निधनावर जम्मू-कश्मीर भाजपाचे अध्यक्ष रविंदर रैना यांच्यासह भाजपच्या इतर नेत्यांनी शोक व्यक्त केला. तसेच मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांनीही एक्सवर पोस्ट करत बुखारी यांना श्रद्धांजली वाहिली.