स्वच्छता मॉनिटर प्रकल्प चोरणाऱ्या मिंधे सरकारविरोधात उपोषण, दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर दोन दिवसांपासून ठाण

प्रोजेक्ट्स लेट्स चेंजअंतर्गत स्वच्छता मॉनिटर अभियान पुण्यातील रोहित आर्या हे 2022 पासून स्वखर्चावर राबवत होते, परंतु त्यांची मूळ संकल्पना असूनही त्यांनाच या प्रकल्पातून डावलण्यात आले आणि प्रोजेक्ट्स लेट्स चेंज स्वच्छता मॉनिटरचा ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’मध्ये समावेश करण्यात आला. मिंधे सरकारच्या या अन्यायाविरोधात रोहित आर्या यांनी आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर आमरण उपोषणासाठी ठाण मांडले आहे.

रोहित आर्या यांची स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आवडली. त्यानंतर 2023 मध्ये शासनाने थोडे अर्थसहाय्य दिले. अभियान मोठे होत गेले. या अभियानासाठी 2 कोटी रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले, मात्र हे आश्वासन पूर्ण तर केले नाहीच, उलट ज्यांची मूळ संकल्पना होती त्या रोहित आर्या यांना प्रकल्पातून बाहेर काढण्यात आले. या अन्यायाविरोधात रोहित आर्या यांनी 23 जुलैपासून उपोषण सुरू केले आहे.

उपोषण आंदोलनाबद्दल कळल्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची 3 ऑगस्टला भेट घेतली आणि त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले, परंतु हे आश्वासन फोल ठरल्यामुळे 8 ऑगस्टपासून रोहित आर्या यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. 18 ऑगस्ट रोजी रोहित आर्या फिट येऊन पडले. त्यांना रुग्णवाहिकेतून ससून रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांनी उपचार घेतले, परंतु आता न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही आणि उपचारही घेणार नाही, असा निर्धार रोहित आर्या यांनी केला आहे.

जिवाचे बरेवाईट झाले तर मुख्यमंत्री जबाबदार

जोपर्यंत फिल्म लेट्स चेंजअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्वच्छता मॉनिटर अभियान मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दोन वर्षे राज्यस्तरावर राबवल्या जात असलेल्या अभियानाचा प्रकल्प संचालक असताना त्यांनी सध्या राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पातून मला डावलले. मी कुठेच नाही. हा माझ्यावर अन्याय असून माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे जबाबदार असतील, असा इशारा रोहित आर्या यांनी दिला आहे.