गेल्या आठवडय़ात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पुढील महिन्यात 15 नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे. गळीत हंगामाच्या तयारीसाठी साखरपट्टय़ात कारखान्यांची लगबग सुरू झाली आहे. जिह्यात साधारण एक कोटी 63 लाख 368 हेक्टरवर उसाचे पीक आहे. महापुरामुळे सरासरी 20 टक्के तूट होऊन किमान 115 लाख मे. टनाहून अधिक ऊस उत्पादीत होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, हंगाम सुरू करण्यापूर्वी मेन्टनन्स खर्च, तोडणी टोळ्यांना ऍडव्हान्स, शासकीय कर व इतर देणी अशी हंगामपूर्व कामे उरकण्याची कारखाना व्यवस्थापनाकडून घाई सुरू आहे. कोल्हापूर जिह्यातील 22 कारखान्यांना हंगामपूर्व खर्चासाठी किमान दीड हजार कोटींची गरज आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून यातील अनेक कारखान्यांना 150 कोटींची मदत होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ सक्षम व काटेकोर व्यवस्थापन असलेले कारखानेच चालू हंगामात तग धरतील, अशी साखर तज्ञांकडून शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर जिह्यात सर्वच साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतल्याने यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्न पार पडण्याची आशा आहे. दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ऊसतोडणी मजूर मोठय़ा संख्येने जिह्यात येण्यास सुरुवात होईल. विदर्भ, मराठवाडय़ात मागील दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने कारखान्यांना ऊसतोडणी मजुरांचा तुटवडा जाणवणार आहे. साखर कारखाना स्तरावर ऊसतोडणी टोळ्या निश्चित करण्यासह तांत्रिक साफसफाईचे काम जोरात सुरू आहे. आता परतीच्या पावसाने साथ देण्याची गरज आहे.