आजपासून महिलांची फटाकेबाजी, महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या थराराला प्रारंभ

आजपासून क्रिकेट विश्वातील महिलासुद्धा फटके आणि फटाके बेधडकपण पह्डू शकतात, याचे दर्शन अवघ्या जगाला पाहायला मिळणार आहे. बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यातील लढतीने महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची आतषबाजी सुरू होणार होणार असून सायंकाळी श्रीलंका-पाकिस्तानदरम्यान दुसरा सामना रंगेल.

या स्पर्धेच्या इतिहासात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या नऊ विश्वचषक स्पर्धांपैकी सहा वेळा जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरलेले आहे. यावेळी हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका हे तुल्यबळ संघ ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरतील.

ही महिला टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती, मात्र राजकीय बंडामुळे तेथील वातावरण असुरक्षित झाल्याने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) स्थलांतरित करण्यात आली. 10 संघांमध्ये 18 दिवस रंगणाऱया या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे आव्हान सर्वच संघांपुढे असणार आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने जगज्जेतेपदाची हॅटट्रिक साजरी केलेली आहे, मात्र हिंदुस्थान, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या देशांनी ऑस्ट्रेलियाला हरविता येऊ शकते. हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. मात्र विश्वचषकसारख्या मोठय़ा स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला हरविणे नक्की सोपी गोष्ट नसते.

हिलीच्या खांद्यावर जबाबदारी

मेग लॅनिंगने निवृत्ती घेतल्यामुळे एलिसा हिली हिच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाची परंपरा राखण्याची जबाबदारी हिलीकडे असेल. तिच्या मदतीला एलिसा पॅरी, अॅश्ले गार्डनर व ग्रेस हॅरिस या अनुभवी खेळाडू असतील.

हिंदुस्थान पहिल्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेत

हरमनप्रीत काwरच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानच्या महिला संघानेही ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखण्याचा पराक्रम केलेला आहे, मात्र 2020 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आणि 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सुवर्णपदकाच्या लढतीत याच ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानला हरविलेले आहे. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या ट्रॉफीच्या प्रतीक्षेत असलेल्या हिंदुस्थानला यावेळी सर्वच स्तरांवर सरस खेळ करावा लागणार आहे. स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज व शेफाली वर्मा यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल. हरमनप्रीत व ऋचा घोष यांना अखेरच्या षटकांमध्ये फलंदाजीत जबाबदारी उचलावी लागणार आहे.

इंग्लंडला संपवायचाय जगज्जेतेपदाचा दुष्काळ

तब्बल 15 वर्षांचा जगज्जेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी इंग्लंडचा संघ यूएईमध्ये दाखल झालाय. त्यांनी 2009 मध्ये पहिले जगज्जेतेपद मिळविले होते. त्यानंतर तीन वेळा फायनल गाठूनही प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केलेला आहे. मात्र, याच इंग्लंडने गतवर्षी महिला ‘अॅशेस’ मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरविण्याचा पराक्रम केला होता. तो मालिका विजय आता इंग्लंडसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सोफी एक्लेस्टोनवर या संघाची खरी मदार असेल. सारा ग्लेन, चार्ली डीन यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असेल, तर अनुभवी नेट स्कीवर ब्रंट ही इंग्लंडच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ असेल.