आभाळमाया – सुसाट त्सुचिनशान!

त्सुचिनशान धूमकेतू आताच एकदम अचानक उगवलेला नाही. 2023 पासून तो खुणावतोय. तो सूर्याजवळ (म्हणजे आपल्यापासून 9 कोटी किलोमीटर अंतरावर) कधीच आलाय, पण येत्या 10 ऑक्टोबरपासून तो संध्याकाळी मावळतीनंतर बुध, गुरू आणि शुप्र यांच्यासह मनोहारी ‘दर्शन’ देऊ शकतो. बहुधा दिसेलच, पण विज्ञानात अंदाजाला ठामपणा देता येत नसतो. प्रत्यक्ष प्रमाणाच्या काही गोष्टी असतात. धूमकेतू ही दृश्य वस्तू त्यामुळे तो दिसणारच.

परंतु त्याचं नेमकं दर्शन कसं होईल ते 8 तारखेपासून सायंकाळी पश्चिम क्षितिजावर नजर लावून पाहू या. 12 तारखेला तो उत्तम दिसेल. कदाचित अपेक्षेपेक्षा खूपच चांगला दिसेल असं म्हणतात. त्याचं खरं रूप 12 तारखेलाच कळेल.

1986 आलेल्या ‘हॅली’च्या धूमकेतूनंतर आम्ही हॅलबॉप, ह्याकुताके या ठळक तसंच आणखीही अनेक धूमकेतू न्याहाळले. हे सगळे धूमकेतू आपली सौरमाला तयार झाली त्याच वेळी (5 अब्ज वर्षांपूर्वी) तयार झालेत. सूर्यातील 2 टक्के वस्तुमानातून नेपच्यूनपर्यंतचे सारे ग्रह, अशनी आणि धूमकेतूही तयार झाले. मात्र धूमकेतू पार दूर म्हणजे 15 कोटी (एयू) गुणिले 1 लाख किलोमीटर अंतरावर फेकले गेले. असे लक्षावधी धूमकेतू आपल्या सूर्यमालेभोवती एखाद्या वेष्टनासारखे (कव्हर) पसरले आहेत. मधमाशांचे मोहळ किंवा ‘पोळ’ असावे तसे!

अनेकदा ते सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने आपलं ‘उर्ट क्लाऊड’ हे निवासस्थान सोडून भटकंतीला सुरुवात करतात. ते सूर्याच्या जवळ खेचले जातात. सूर्याभोवती गरगरत अखेर सूर्यातच विलीन होतात. परंतु काहींचा आकार मोठा असतो. त्यातील द्रव्य म्हणजे दगड, धोंडे, धूळ आणि बर्फ मोठ्या प्रमाणावर असल्याने एखाद्या मोठ्या गोळ्याच्या स्वरूपात आलेले हे धूमकेतू सूर्याजवळ येताच सूर्याच्या उष्णतेने त्यातील बर्फ वितळून त्यांना शेपूट फुटते. 1910 मध्ये हॅली धूमकेतूचं शेपूट एवढं मोठं होतं की, त्यातून पृथ्वी पसार झाली होती. त्या वेळी पाश्चात्त देशात खगोलीय पह्टोग्राफी होती, पण रूढीवादही प्रबळ होता. धूमकेतूविषयीचे पारंपरिक गैरसमज आणि त्याच्या ‘अवकृपेतून वाचण्याचे उपाय’ ही ‘पापविमोचक पास’च्या स्वरूपात विकले गेले असे सांगितले जाते. आता जगभरची नवी पिढी विज्ञान जाणते. धूमकेतू आवर्जून पाहते.

तर सध्या आलेला त्सुचिनशान धूमकेतू नानकिंग येथील वेधशाळेतून चिनी खगोल संशोधकांनी पाहिला, त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतल्या ‘अ‍ॅटलास’ वेधशाळेतून 2023 च्या जूनमध्येच पाहिला. मग त्याचा सर्वत्र अभ्यास सुरू झाला. अ‍ॅटलास वेधशाळा म्हणजे अ‍ॅस्टेरॉइड टेटेस्ट्रिअल इम्पॅक्ट, लास्ट अ‍ॅलर्ट असं लांबलचक नाव. थोडक्यात ‘अ‍ॅटलास’. मात्र दोन ठिकाणी संशोधन एकाच वेळी झाल्याने धूमकेतूचे नाव त्सुचिनशान (म्हणजे सहनशील) आणि अ‍ॅटलास असे जोडनावाच्या स्वरूपात प्रसिद्ध झाले.

त्सुचिनशानची कक्षा अतिलंबवर्तुळाकार (पॅरॅबोलिक) असल्याने तो परतला तर लाखो वर्षांनीच. ‘हॅली’सारखा दर 76 वर्षांनी येणारा ‘पिरियॉडिक’ किंवा विशिष्ट काळाने येणारा हा धूमकेतू नाही. तो पाहायला मिळाला तर संधी सोडू नका.

12-13 ऑक्टोबरला तो आपल्या धुव ताऱ्यासारखा अधिक दोन दृश्यप्रतीचा म्हणजे बऱ्यापैकी ठळक आणि नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकेल. मावळतीनंतर लगेच आकाशात पश्चिमेला दुर्बिण रोखली तर त्याचं सुंदर रूपही दिसू शकतं.

या धूमकेतूचा अवकाशीय पत्ता म्हणजे कन्या (वर्गो) राशीच्या किंवा तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर तो तेजस्वी शुक्र ग्रहाला समांतर असा दिसेल. नुसत्या डोळ्यांनी दिसला तर उत्तमच, पण छोट्या 3 ते 4 इंची व्यासांच्या दुर्बिणीतूनही तो छान दिसू शकतो. त्याचा वेग सुसाट म्हणजे सेकंदाला 68 किलोमीटर आहे!

एकाच गोष्टीचा अडथळा त्यात येऊ नये तो म्हणजे ढगाळ वातावरणाचा. मुंबईसारख्या शहरापासून निवांत आणि प्रदूषण कमी असणाऱ्या ठिकाणी जाणं चांगलं, पण 12 तारखेलाच दसरा आहे. त्या संध्याकाळी ‘वैज्ञानिक सीमोल्लंघन’ करून दूरवरून आलेल्या या त्सुचिनशान नावाच्या पाहुण्याला वैचारिक ‘सोनं’ द्यायला काय हरकत आहे. अर्थात 8 ते 14 तारखेपर्यंत तो दिसू शकेल.

कोणताही किंतु मनात न बाळगता मनात वैज्ञानिक हेतू ठेवून हा धूमकेतू पाहिला तर लाखो वर्षातल्या एका अनुभवाचं साक्षीदार होता येईल. आपले प्राचीन हिंदुस्थानी खगोलतज्ञसुद्धा धूमकेतूचे म्हणजे धुरकट शेपूट असलेल्या ‘नक्षत्रा’चे महत्त्व जाणत होते. आता आधुनिक काळात असा निखळ आनंद देणाऱ्या विराट विश्वात विनामूल्य पाहायला मिळणाऱ्या संधीचं ‘सोनं’ दसऱ्याचा आसपास करता आलं तर पहा!

[email protected]