हाजीअली दर्ग्यात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला हरियाणातून अटक केली आहे. पवन कुमार मिश्रा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिश्राला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आयपी अॅड्रेस ट्रेस करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
आपण इंटरनेटवरून हाजीअली दर्ग्याच्या कार्यालयाचा नंबर मिळवला. मात्र आपण दारुच्या नशेत हा फेक कॉल केल्याचे आरोपीने पोलीस चौकशीत सांगितले. ताडदेव पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.
आरोपीने 26 सप्टेंबर रोजी हाजीअली दर्ग्यातील कार्यालयात फोन करून बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. यानंतर हाजीअली दर्गा ट्रस्टीचे अधिकारी मोहम्मद ताहेर शेख यांनी ताडदेव पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस पथक, बॉम्ब स्कॉड यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ शोध सुरू केला. मात्र दर्ग्यात कोणताही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
ताडदेव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. यानंतर आरोपीचा आयपी अॅड्रेस ट्रेस करत पोलिसांनी गुरुग्राममधून त्याच्या मुसक्या आवळल्या.