केंद्र व राज्य शासनाकडून शासकीय रुग्णांलयांमधील आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात या हेतूने आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षातील कायाकल्प पुरस्काराची घोषणा मंगळवारी (01 ऑक्टोबर) आरोग्य विभागाकडून करण्यात आली. त्यामध्ये दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पिसईला जिल्हात चौथ्या क्रमांकाने गौरविण्यात आले.
दापोली तालुक्यातील पिसई प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्या अंतर्गत शिरखल, खेर्डी, पालगड, माटवण, विसापूर, मुगिज ही उपकेंद्रे जिल्हयात विजयी झाली आहेत. तसेच शिरखल उपकेंद्र जिल्हयात तिसऱ्या स्थानी आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र पिसईला जिल्ह्यात चौथा क्रमांक मिळाला आहे. प्राप्त परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत तसेच डॉ. जोईल यांनी तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सहकारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपकेंद्रात आलेल्या रुग्णांना दिलेली उत्तम सुविधा आणि त्यामुळे वाढलेली ओपीडी त्यामुळे हे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी यांचे सांघिक यश आहे.
योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये
लोक/कर्मचारी सहभागातून शासकीय आरोग्य संस्था स्वच्छ व सुसज्ज करणे. राज्य शासनाच्या रुग्णालयातून गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून देऊन त्याद्वारे जनतेचा शासनाच्या आरोग्य संस्थांवरील विश्वास वाढविणे व सर्व सार्वजनिक आरोग्य सेवांकडे सर्वांना आकर्षित करणे, शासकीय आरोग्य संस्थामधून देण्यात येणाऱ्या सेवेची गुणवत्ता व परिणामकारकता वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. रुग्णांचे आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाधान करणे. शासकीय आरोग्य संस्थांमधील प्रसुतीचे प्रमाण वाढविणे. शासकीय आरोग्य संस्थांमधील बाह्यरुग्ण व आंतर रुग्णांची संख्या वाढविणे, तरी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 2023-24 या वर्षातील कायाकल्प पुरस्काराकरिता पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, डॉ. जोईल तसेच सुपरवायझर व आरोग्य सेविका, आरोग्य सेवक सर्व कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या संपूर्ण स्टाप यांच्या उत्तम सहकार्यामुळे हे यश गाठता आले. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र पिसईचे दापोलीत अभिनंदन होत आहे.
दापोली तालुक्यातील पिसई प्राथमिक आरोग्य केंद्र हे दापोली मंडणगड मार्गावर अगदी हम रस्त्यावर आहे. तर उपकेंद्रे ही अगदीच ग्रामीण भागात आहेत तेथील सोयी सुविधा आणि एकूणच परिस्थिती पाहता वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक सेविका तसेच सर्व कर्मचारी यांच्या सांघिक कामामुळेच पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाव जिल्हयात झाले आहे. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानल्याने पिसई प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्वोत्तम कामगिरीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.