हॉटेल मॅनेजर आणि तरुणावर कोयत्याने हल्ला; जिल्ह्यात कोयत्याची दहशत सुरूच

बारामतीतील महाविद्यालयात दप्तरातून कोयता आणून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याची घटना ताजी असतानाच हॉटेलच्या मॅनेजरवर आणि तरुणावर पुन्हा कोयत्याने हल्ला केल्याच्या दोन घटना शिरूरमध्ये घडल्या.

एक लाख रुपये देण्यास नकार देणाऱ्या एका हॉटेलच्या मॅनेजरवर एकाने कोयत्याने वार केले.

पिंपरखेड येथील हॉटेल विसावा येथे काल ही घटना घडली. “मॅनेजरला एक लाख रुपये दे,” अशी मागणी करून ते देण्यास नकार दिल्याने मॅनेजरवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला.

याबाबत हरेश ठकाजी चोरे (वय 45, रा. जांबुत, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत सारंगकर शिरसाठ (रा. ढोमेमळा, पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहे.

बाजारात निघालेल्या तरुणावर वार बाभूळसर येथे दुपारी झालेल्या भांडणातून राग मनात धरून मित्रांबरोबर बाजारात निघालेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले.

याबाबत अक्षय रामदास शिवले (वय 26, रा. ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. निखिल रामचंद्र वीडगीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 29 सप्टेंबर सायंकाळीं साडेसहा वाजेच्या सुमारास बाभूळसर डहाळे यांच्या बिल्डिंगजवळील रॉयल चिकन शॉपी नावाच्या दुकान समोरून फिर्यादी त्याचे मित्र अनिकेत मगरे व धनंजय भोसले यांच्यासह पायी कारेगाव येथील बाजारात जात असताना दुपारी झालेल्या वादाच्या कारणावरून निखिल रामचंद्र वीडगीर याने रॉयल चिकन शॉपी दुकानातील कोयता घेऊन माझ्या पाठीमागून येऊन माझ्या पाठीच्या डाव्या बाजूस मारून दुखापत केली. मी तेथून पळून जाऊ लागलो, तेव्हा त्याने त्याच्या हातातील कोयता माझ्या दिशेला फेकून मला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश आगलावे करत आहे.

भाईंची फुकटेगिरी
परिसरात दहशत माजविण्याबरोबरच ‘भाईगिरी’ करण्यासाठी कोयत्याचा वापर सर्रास सुरू झाला. कोयत्याच्या धाकाने खंडणी, हॉटेलमध्ये फुकट जेवण, अगदी वडापाव, सिगारेट, गुटख्याची मागणी, कपडे उधार देण्यास नकार देणाऱ्यांवर कोयत्याने वार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली.

बोहरी आळीतील एका
हार्डवेअरच्या दुकानावर छापा टाकून 105 कोयते गुन्हे शाखेने जप्त केले होते. त्यामुळे कोयता विक्रेत्यांमध्ये घबराट पसरली होती.