राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या डोंबिवलीत रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून खड्ड्यांमुळे दोन अपघात घडले आहेत.यात एका महिलेचा मृत्यू झाला असून 60 वर्षीय वृद्ध जखमी झाले आहेत. दरम्यान वारंवार होणाऱ्या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका अजून किती जणांचे बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
डोंबिवली येथील गरीबाचा वाडा परिसरात काही दिवसांपूर्वी सतीश कनोजिया आणि त्यांची पत्नी प्रमिला कनोजिया आपल्या मुलासह दुचाकीवरून घरी परतत होते. त्यावेळी रस्त्यावरील खड्यांमुळे त्यांचा दुचाकीवरून तोल गेला आणि ते खाली पडले. दुर्दैवाने प्रमिला कनोजिया यांच्यावरून मागून येणारा ट्रक गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. तर दुसरीकडे याच परिसरातील ६० वर्षीय तुकाराम नेहते खड्ड्यांमुळे दुचाकीवरून तोल जाऊन रस्त्यावर पडले. या अपघातात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. नेहते यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने भरपाईची मागणी स्थानिकांनी केली आहे.
अन्यथा नागरिकांचा उद्रेक
दोन्ही अपघात एकाच परिसरात घडले आहेत. नागरिकांनी आधीच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. केडीएमसीकडून रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून रस्त्याची दुरुस्ती तत्काळ हाती घ्यावी अन्यथा प्रशासनाच्या विरोधात उद्रेक होईल, असा इशारा नागरिकांनी दिली आहे.
रिक्षा संघटना आक्रमक
अपघाताच्या पाश्र्वभूमीवर रिक्षाचालक संघटनेनेदेखील या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. रिक्षा संघटनेने सहाय्यक आयुक्तांना लेखी तक्रार देत दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून तातडीने रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
‘हॅप्पी खड्डे डे’ बॅनरची दिसली प्रचिती
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मतदारसंघात अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. दरम्यान याच मंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त काही दिवसांपूर्वी शहरात ‘हॅप्पी खड्डे डे’ अशा आशयाचे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आता त्याच बॅनरची प्रचिती डोंबिवलीकरांना येत आहे.