गांधीजींबाबत पंतप्रधानांचे वक्तव्य ‘कौतुकास्पद’; शरद पवारांची मोदींवर उपरोधिक टीका

sharad pawar narendra modi

महात्मा गांधी जयंती हा गांधीजींचा विचार देण्याचा जागतिक दिवस आहे. त्यांचे विचार जगाने स्वीकारले आहे. कुठेही गेले तरी त्यांच्या विचाराच्या खुणा दिसतात. आपल्या देशाची प्रतिष्ठा त्यांनी वाढवली. तरीही ‘गांधी’ या चित्रपटामुळे त्यांचे नाव जगाला कळाले, असे आपले पंतप्रधान म्हणतात, याबद्दल त्यांचे ‘कौतुकच’ केले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलातर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी होते. शिवाजीराव कदम, अभय छाजेड, एम.एस. जाधव, अन्वर राजन, डॉ. ऊर्मिला सप्तर्षी, डॉ. प्रवीण सप्तर्षी, रामदास फुटाणे, जयदेव गायकवाड, प्रशांत कोठडिया, प्रशांत जगताप, काका चव्हाण, युवराज शहा, विकास लवांडे, जांबुवंत मनोहर, डॉ. शशिकला राय, चंद्रकांत मोकाटे, अप्पा अनारसे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘डॉ. कुमार सप्तर्षी आणि आम्ही एकत्र काम केले आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात बिगर काँग्रेस पहिले सरकार आले, त्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यात एसेम जोशी, डॉ. सप्तर्षी होते. डॉ. आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यश आले. त्यात त्यांची साथ मिळाली.’

डॉ. अशोक वाजपेयी म्हणाले, ‘भारतीय समाज गांधी विचारापासून दूर गेला आहे. त्यांच्यावर टीका करणारे वाढत आहेत. सर्वधर्म प्रार्थना सभेची त्यांची कल्पना जगात एकमेवाद्वितीय आहे.’ डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, ‘वसंतराव नाईक यांच्या काळात पहिला मिसा शरद पवार यांना माझ्या नावे काढावा लागला होता.

तरीही पुलोद स्थापना, नामांतरप्रसंगी आमचे विचार एकच होते.’ यावेळी सुरेश द्वादशीवार यांच्या ‘गांधी आणि त्यांचे टीकाकार’ या पुस्तकाच्या Gandhi And His Critics या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन झाले. शरद पवार यांच्या हस्ते ‘सलोखा’ गटाचे प्रमोद मजुमदार यांना सामाजिक योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.