घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत पालिकेने वर्षाला तब्बल अडीच कोटी रुपये जादा दराने दिलेल्या ठेक्याविरोधात महाबळेश्वरकर आक्रमक झाले असून, नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. मनमानी कारभाराचा ठराव 308नुसार रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ठरावाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली असून, शुक्रवारी (दि.4) संयुक्त बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
डेपोपर्यंत पोहोचविणे व रस्ते आणि गटारे यांची वर्षभर स्वच्छता राखणे, शहरातील ओला-सुका कचरा गोळा करणे या कामांसाठी पालिकेला दरवर्षी सव्वा ते दीड कोटी खर्च येत होता. सध्या पालिकेत प्रशासकीय कारभार सुरू असून, ते मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. दीड कोटीच्या कामाचा ठेका तीन कोटी 75 लाखांना देऊन अधिकारी व ठेकेदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे पालिकेला वर्षाला तब्बल दोन ते अडीच कोटींचा फटका बसणार, हे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झाल्यानतंर शहरात एकच खळबळ उडाली.
ठेकेदारांशी संगनमत करून पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी पालिका लुटण्याचा केलेला डाव हाणून पाडण्यासाठी शहरातील अनेक माजी लोकप्रतिनिधी व पत्रकार एकत्र आले. त्यांनी तातडीने बैठक घेऊन याबाबत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सातारा येथे भेट घेत निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, माजी उपनगराध्यक्ष अफझल सुतार, माजी नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, संदीप साळुंखे, विशाल तोष्णिवाल, अतुल सलागरे, पत्रकार विलास काळे, अभिजित खुरासणे, सचिन शिर्के आदी उपस्थित होते. मुख्याधिकारी पालिकेचे मोठे नुकसान करीत असून, पालिकेचे नुकसान करणारा ठराव 308 नुसार रद्द करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
मुख्याधिकारी, ठेकेदार व एक माजी नगरसेवक या ठरावामागे असल्याचेही शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मुख्याधिकाऱ्यांना फोन करून माहीती घेत ठरावाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (4 रोजी) महावळेश्वर येथे तातडीची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत या प्रकरणाची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.
‘तो’ ठराव अडकला वादात
पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत केलेला तीन वर्षांचा ठराव शहरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीमुळे वादात अडकला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील या ठरावाला तत्काळ स्थगिती दिल्याने यासंदर्भात आयोजित केलेल्या 4 तारखेच्या बैठकीवर या ठरावाचे भवितव्य अवलंबून आहे.
पाचपट मोठ्या वाईपेक्षा महाबळेश्वरातील ठरावच महाग!
या शिष्टमंडळाने भुईंज येथे आमदार मकरंद पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रशासक योगेश पाटील यांच्या कामाबाबत चर्चा केली. आमदार मकरंद पाटील यांनी ठरावाबाबत आश्चर्य व्यक्त करीत आम्ही वाईतदेखील अशाच पद्धतीने कामाचा ठेका दिला आहे. महाबळेश्वरपेक्षा वाई शहर पाच ते सहापट मोठे आहे. तसेच महाबळेश्वर पालिकेने केलेल्या ठरावापेक्षा अधिक कामांचा ठरावात समावेश आहे. हे काम वर्षाला केवळ पाच कोटींमध्ये केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर पालिकेने पावणेचार कोटींचा ठराव केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.