शिवसेनेचा शनिवारी पार्ल्यात ‘महा नोकरी’ मेळावा, हजारो बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी; उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हजारो बेरोजगार तरुणांना शिवसेनेने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. शिवसेनेच्या वतीने येत्या शनिवारी विलेपार्ले येथे ‘महा नोकरी’ मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार असून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार, शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी निवडणूक जाहिरनाम्यात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा ‘महा नोकरी’ मेळावा शिवसेनेच्या माध्यमातून आयोजित केला आहे. विलेपार्ले पूर्व सहारा हॉटेलजवळ बालाजी रेस्टॉरंटच्या एटीसी टॉवरसमोर 1 बी एमएलसीपी पार्पिंग तळमजला येथे हा मेळावा शनिवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. मिंधे सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड वाढली असून तरुणांमध्ये असंतोष आहे. त्या तरुण पिढीला नोकऱया देण्याचा प्रयत्न या मेळाव्याद्वारे केला जात असल्याचे अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

या मेळाव्यात लॉजिस्टीक, बँपिंग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील 130 कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये अॅमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

या मेळाव्यासाठी 13 हजार युवकांनी नोंदणी केली आहे. सुमारे 16 हजार युवक मेळाव्यात सहभाग घेणे अपेक्षित असून सुमारे 14 हजार युवकांना या मेळाव्यात रोजगार मिळेल. मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांनी येताना बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्र सोबत आणावे, असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.