कळव्यातील शाळेत 40 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

फाईल फोटो

उग्र वास येत असताना मटकीची आमटी खायला दिल्याने कळव्यातील सहकार विद्याप्रसारक मंडळाच्या शाळेतील तब्बल 40 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना आज घडली. भात आणि आंबलेली मटकीची आमटी खाल्ल्यानंतर काही वेळातच सर्व मुलांना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे हादरलेल्या शाळा व्यवस्थापनाने सर्वांना पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तातडीने दाखल केले. वेळेत उपचार झाल्याने सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान जेवणाला वास येत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी करूनही त्याकडे शिक्षकांनी कानाडोळा केल्याचा आरोप संतप्त पालकांनी केला.

कळव्यातील सह्याद्री परिसरात सहकार विद्याप्रसारक मंडळाची खासगी शाळा आहे. या शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून आज विषबाधा झाली. शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. आहारात मुखत्वे करून खिचडी दिली जाते. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.