>> राहुल गोखले, [email protected]
चिंतामणराव (सी.डी.) देशमुख यांचे व्यक्तिमत्त्व बहुपेडी होते आणि त्यांच्या विद्वत्तेमुळे व कर्तृत्वामुळे तसेच प्रसंगी दाखविलेल्या बाणेदारपणामुळे त्यांच्या नावाला वलय लाभले होते. चिंतामणरावांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही अनोख्या पैलूंना उजाळा देणारा हा लेख…
‘दि कोर्स ऑफ माय लाईफ’ या चिंतामणरावांच्या आत्मचरित्रातून त्यांच्या बहुपेडी जीवनाची कल्पना येऊ शकेल. रामचंद्र कृष्ण लागू आणि पुढे महामहोपाध्याय म्हणून मान्यता पावलेले आणि ‘भारतरत्न’ सन्मानाने गौरविले गेलेले पां.वा.काणे यांच्यासारख्या शिक्षकांकडून चिंतामणरावांना शालेय जीवनात संस्कृत शिकता आले. कालिदासरचित ‘रघुवंश’ आणि अन्य संस्कृत महाकाव्ये चिंतामणरावांनी लहानपणीच मुखोद्गत केली होती. एवढेच नाही तर स्वतः संस्कृत काव्ये रचली होती. त्यांनी रचलेली संस्कृत काव्ये लिहिलेल्या दोन वह्या त्यांचे शिक्षक लागू यांनी जपून ठेवल्या होत्या आणि पुढे चिंतामणराव रिझर्व्ह बँकेत रुजू झाले तेव्हा लागू यांनी त्या वह्या आपल्या शिष्योत्तमाला सोपविल्या. चिंतामणरावांनी रचलेल्या संस्कृत काव्यांवर आधारित ‘संस्कृत काव्य मालिका’ हे पुस्तक 1970च्या दशकात प्रकाशित झाले तेव्हा त्यात त्या वह्यांतील काही रचना समाविष्ट करण्यात आल्या होत्या. पुढे चिंतामणरावांनी कालिदासाच्या ‘मेघदूत’चे मराठी भाषांतर केले.
चिंतामणराव जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्तीचे पहिले मानकरी ठरले. त्यांच्या त्या यशाने आनंदित झालेले प्रतिभावान कवी गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी) यांनी त्यावर ‘आनंद वर्धापन’ नावाची कविता लिहिली. गडकरी आपल्या अंतिम काळात नागपूरजवळील सावनेर येथे आपल्या ‘राजसंन्यास’ नाटकाचे लेखन करीत होते. चिंतामणराव तेथून सव्वाशे मैलांवर कामासाठी नियुक्त होते, पण गडकरी यांचे 1919 साली निधन झाले आणि गोविंदाग्रज आणि आपली भेट राहूनच गेली याची खंत चिंतामणरावांना कायम राहिली. प्रगत संस्कृतच्या काही परीक्षा चिंतामणरावांनी कोलकाता येथे जाऊन दिल्या. त्या वेळी त्यांचा परिचय रवींद्र संगीताशी झाला. पुढे चिंतामणराव बंगाली भाषा शिकले, एवढेच नाही तर रवींद्रनाथ टागोर यांच्या काही काव्यरचनांचे मराठीत भाषांतर केले.
1934 साली त्यांची नेमणूक सरकारच्या वित्त सचिवपदी झाली आणि त्याच संदर्भातील एका दौऱ्यावेळी 1936 साली त्यांची भेट रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जेम्स टेलर यांच्याशी झाली. रिझर्व्ह बँकेचे भारताकडे नियंत्रण देण्याचे विधेयक तयार करण्यासंदर्भात ते काम करीत होते. आर्थिक क्षेत्रातील तज्ञ म्हणून टेलर यांचा लौकिक होता. चिंतामणरावांची नेमणूक बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी होणार होती, पण बँकेच्या केंद्रीय मंडळामधील गुजराती सदस्यांचा एका मराठी माणसाने त्या पदावर जाण्यास विरोध असल्याने सर जेम्स ग्रिग यांनी चिंतामणरावांच्या त्या नियुक्तीस आडकाठी केली होती. मात्र टेलर यांचा चिंतामणरावांवर विश्वास होता. मणिलाल नानावटी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी चिंतामणराव बँकेचे डेप्युटी गव्हर्नर झाले. पुढे टेलर व्याधिग्रस्त झाले आणि 1942 साली त्यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर चिंतामणरावांना बँकेचे काळजीवाहू गव्हर्नर नेमण्यात आले. 1943 आली त्यांना रीतसर गव्हर्नर नियुक्त करण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून चिंतामणरावांनी सूत्रे स्वीकारली. त्या वेळी महायुद्ध सुरू असल्याने भारतीय व्यक्तीकडे ती धुरा सोपविण्यास ब्रिटिश सरकार राजी नव्हते, पण बँकेच्या संचालक मंडळाच्या सदस्यांचा आग्रह आणि ब्रिटिश गृहमंत्री लिओ अॅमेरी यांची ठाम भूमिका यामुळे चिंतामणरावांची नियुक्ती सुकर झाली. त्या नियुक्तीचे सर्वदूर स्वागत झाले. शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांनी त्यांच्या गाजलेल्या मत्स्यकन्या शिल्पाचे ब्रॉन्झ धातूतील लघुरूपातील शिल्प चिंतामणरावांना भेट म्हणून दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाले; त्याबरोबरच फाळणी झाली. ‘रिझर्व्ह बँक ऑफ पाकिस्तान’ची स्थापना 1948 सालच्या एप्रिलमध्ये झाली. तोवर म्हणजे स्वातंत्र्यानंतर जवळपास सात महिने चिंतामणराव रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि दोन्ही देशांच्या अर्थकारण प्रणालीचे नेतृत्व करीत होते.
स्वतंत्र भारतात रिझर्व्ह बँकेच्या कारभाराचा पाया चिंतामणरावांनी घातला. बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्या कार्यकाळात झाले. बँकेच्या संशोधन-विदा विभागाची स्थापना त्यांच्या कार्यकाळात झाली. साहजिकच आर्थिक स्थितीची माहिती एकत्रित होण्यास आणि पर्यायाने अचूक विश्लेषण होण्यास चालना मिळाली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि पुढे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून चिंतामणरावांनी स्वतंत्र भारताच्या प्रारंभिक काळात मोलाचे योगदान दिले. महायुद्धामुळे झालेला चलन फुगवटा, नवस्वतंत्र देशाची आर्थिक घडी बसवणे, अर्थकारणाला दिशा देणे अशी आव्हाने त्यांच्यासमोर होती. उद्योगांना, शेतीला अर्थपुरवठा करण्याच्या दृष्टीने योजनांना चिंतामणरावांनी मूर्त स्वरूप दिले. नियोजन मंडळ, पंचवार्षिक योजना, देशाची कर प्रणाली अशा विविध विषयांत चिंतामणरावांची भूमिका महत्त्वाची ठरली. भारतीय आयुर्विम्याचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला केंद्रातील नेहरू सरकार अनुपूलता दर्शवत नसल्याचे लक्षात आल्यानंतर देशमुखांनी बाणेदारपणा दाखवत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा आचार्य अत्र्यांनी ‘चिंतामणी झाला कंठमणी’ हा लेख लिहून त्यांचा गौरव केला.
चिंतामणराव यांनी यशाची शिखरे पार केली तरी ते निःस्पृह राहिले. केद्रीय मंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर त्यांची नियुक्ती विद्यापीठ अनुदान मंडळाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी झाली. त्या पदाचे वेतन हे मंत्र्याच्या वेतनापेक्षा अधिक असल्याने आपण त्यासाठी मंत्रीपद सोडले असा आरोप होऊ नये म्हणून त्यांनी अवघ्या एक रुपया वेतनावर ते पद स्वीकारले. लोकापवादाची एवढी चिंता आजच्या काळात दुर्मिळ. चिंतामणराव इंग्लंडला आयसीएसचे शिक्षण घेत असतानाच्याच काळात लोकमान्य टिळक चिरोल खटल्यासंबंधात इंग्लंडला गेले होते. तेव्हा चिंतामणरावांनी त्यांची भेट घेतली. आपण आयसीएस होत असलो तरी आपण राजकारणात भाग घेणे हे आपले कर्तव्य ठरते का? यावर लोकमान्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यावर ‘‘भारताला आज ना उद्या स्वातंत्र्य मिळेलच. तेव्हा तुमच्यासारख्या प्रशिक्षित प्रशासकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता देशाला भासेल.. तुम्ही प्रशासनाचे शिक्षण घेतले आहे. स्वातंत्र्य लढय़ात सहभागी होऊन त्यातून काही फारसे चांगले साध्य होईल असे नाही,’’ असा मौलिक सल्ला लोकमान्यांनी त्यांना दिला होता. लोकमान्यांचा सल्ला चिंतामणरावांनी शिरोधार्ह मानला. स्वातंत्र्योत्तर काळात चिंतामणराव काही काळ राजकारणात अवश्य होते. मात्र तेथे कराव्या लागणाऱ्या लटपटी-खटपटी करण्याची त्यांची वृत्ती नव्हती. त्यांचा पिंड हा विद्वानाचा होता आणि अध्ययन-संशोधनात ते रमत असत. मात्र त्या विद्वत्तेला रसिकतेचा लोभस पैलू होता.