बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात उच्च न्यायालयाने आज पुन्हा एकदा मिंधे सरकार आणि पोलिसांना फटकारले. ज्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली, त्या शाळेच्या ट्रस्टींना अद्याप अटक का केली नाही? पोलीस नेमकी कसली वाट पाहत आहेत? आरोपी ट्रस्टींना अटकपूर्व जामीन मिळावा, याची वाट पाहताय का? असा प्रश्नांचा भडीमार करीत न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.
दोन चिमुकल्या शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर आज न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी मिंधे सरकार आणि बदलापूर प्रकरणात स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या वतीने महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली. त्यांनी तपासाबाबत दिलेल्या माहितीवर खंडपीठाने असमाधान व्यक्त केले.
सुनावणीवेळी खंडपीठाने लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्याच्या तपासाची सद्यस्थिती विचारली. तपास योग्यप्रकारे सुरु असल्याचा दावा महाधिवक्त्यांनी केला. मात्र शाळेचे दोन ट्रस्टी अद्याप मोकाट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने पोलिसांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला. तुम्ही त्या दोन्ही ट्रस्टींना अद्याप अटक का केली नाही? एका गंभीर गुन्ह्यात पोलीस इतके ढिम्म कसे राहतात? असा संतप्त सवाल खंडपीठाने केला. याचवेळी तपासात आतापर्यंत काय काय केले, याचा सविस्तर तपशील असलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले. याप्रकरणी २३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे.
शाळेच्या ट्रस्टींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
बदलापूरच्या शाळेच्या चेअरमन आणि सचिवाने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरही आज एकलपिठापुढे सुनावणी झाली. आरोपी तुषार आपटे आणि उदय कोतवाल या दोन्ही आरोपींचा अर्ज न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांनी फेटाळून लावला. आरोपींना मुलींवरील लैंगिक अत्याचाराची पूर्ण कल्पना होती. त्यांनी त्या प्रकाराबाबत तातडीने पोलिसांना कळवायला हवे होते, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. एकीकडे द्विसदस्यीय खंडपीठाने पोलिसांना लगावलेले फटकारे आणि दुसरीकडे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला गेल्याने दोन्ही ट्रस्टींना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.