लेबनॉनवरील पेजर हल्ला हा इस्रायलचा मास्टरस्ट्रोक… लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे वक्तव्य

लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक सदस्यांच्या पेजर स्फोटाने संपूर्ण जग हादरले. या स्फोटांत 40 जण ठार झाले तर तीन हजारांहून अधिक जखमी झाले. या स्फोटांवर हिंदुस्थानी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पेजर हल्ल्याबाबत वक्तव्य केले आहे.

जनरल उपेंद्र द्विवेदी यांना एका कार्यक्रमात पेजर हल्ल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी इराण समर्थित हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला मार्गी लावण्यासाठी लेबनॉनला पाठवलेले पेजर बनवणारी शेल कंपनी स्थापन करण्याचे इस्रायलचे पाऊल मास्टरस्ट्रोक होते, असे म्हटले. या कारवाईसाठी इस्रायल नक्कीच वर्षानुवर्षे तयारी करत असावा असे देखील त्यांनी सांगितले.

ज्या पेजरचे स्फोट घडवण्यात आले ते पेजर हंगेरियन कंपनीने तैवानच्या एका ब्रँडच्या नावाने पेजर तयार करण्यात आले होते. त्यानंतर हंगेरियन कंपनीने हे पेजर हिजहुल्लाहला पुरवले. इस्रायलने ज्या पद्धतीने शेल कंपनीची स्थापना केली तो त्यांचा मास्टरस्ट्रोक होता. अशा प्रकारचे हल्ले घडवून आणण्यासाठी अनेक वर्षे तयारी करावी लागते. ज्या दिवशी लढाईला सुरुवात करता त्या दिवशी युद्ध सुरू होत नाही. तुम्ही युद्धाचे नियोजन करण्यास सुरूवात करता त्याच वेळी युद्धाला सुरूवात झाली असे समजले जाते, असे जनरल द्विवेदी म्हणाले.

तज्ञांनी याला पुरवठा साखळी हल्ला असे म्हटले आहे, ज्यामध्ये पुरवठादार वेगवेगळ्या प्रांतात घुसखोर करतो आणि उपकरणांमध्ये कमी प्रमाणात स्फोटके ठेऊन त्याचा पुरवठा करतो.

आपल्या देशाला अशा हल्ल्यांपासून वाचवायचे झाल्यास पुरवठा साखळीतील अडथळे टाळावे लागतील. त्यावर लक्ष ठेवावे लागले. यासाठी तांत्रिक स्तरावर किंवा प्रत्यक्ष चौकशी करावी लागेल. अशा घटना देशात घडू नये यासाठी काळजी घ्यावी लागेल.