गुजरातमध्ये नोटांवर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचे चित्र, नकली नोटांच्या बदल्यात दीड कोटीचे सोने लुटले

गुजरातमध्ये बनावट नोटा देऊन तब्बल 1.60 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे या नोटांवर महात्मा गांधीजींऐवजी अभिनेते अनुपम खेर यांचे चित्र होते, तर रिझर्व्ह बँकऐवजी रिसोल बँक ऑफ इंडिया लिहिले होते.

सराफा व्यापारी मेहुल ठक्कर यांची अशाप्रकारे फसवणूक झाली असून त्यांच्याकडून बनावट नोटा ताब्यात घेण्यात आल्या आहेत. 1 कोटी 30 लाख रुपयांची रोख रक्कम एका व्यक्तीने 2100 ग्रॅम सोन्याची बिस्किटे विकत घेण्याच्या बदल्यात दिल्याचे ठक्कर यांनी सांगितले. बाकीचे 30 लाख रुपये मित्र आणत आहे, असे सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली.

मशीनमधून नोटा मोजल्या जाऊ लागल्या तेव्हा त्या बनावट असल्याचे उघड झाले. पोलिसांनी याप्रकरणी तीन तरुणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामागील सूत्रधार कोण आणि नोटा पुठे छापल्या गेल्या याचा तपास आता पोलीस करत आहेत. बँकांमध्ये ज्या प्रकारे नोटांचे बंडल बनवले जातात त्याचप्रमाणे बनावट नोटांची मांडणी करण्यात आली होती. त्यामुळे या नोटा खऱया असल्यासारख्या भासत होत्या. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ठक्कर म्हणाले. दरम्यान, फसवणूक करणारी टोळी राजस्थानची असावी, असा पोलिसांना संशय आहे.

नेमकी कशी झाली फसवणूक?

अहमदाबादमधील पुष्पपंदील बंगला येथे राहणारे व्यापारी मेहुल ठक्कर यांचे मानेक चौकात दागिन्यांचे दुकान आहे. 23 सप्टेंबर रोजी एका परिचित ज्वेलरी शॉपचे व्यवस्थापक प्रशांत पटेल यांनी पह्न करून एका पार्टीला 2100 ग्रॅम सोन्याची बिस्किटे घ्यायची असल्याचे सांगितले. 1.60 कोटी रुपयांना सौदा झाला. दुसऱया दिवशी प्रशांत पटेल यांनी मेहुल ठक्कर यांना पह्न केला आणि डिलिव्हरी घेणाऱया पार्टीला सोन्याची तातडीने गरज असल्याचे सांगितले. त्यांना तातडीने शहराबाहेर जावे लागत असल्याचे सांगत या पार्टीला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करता येत नसल्याचेही सांगितले. त्यामुळे ते रोख रक्कम देतील असे ठरले. सोन्याची डिलिव्हरी घेणारी पार्टी सध्या सीजी हायवे रोडवरील कांतीलाल मदनलाल अॅण्ड पंपनीत बसली आहे. तिथे सोने पाठवा असे सांगण्यात आले. मेहूल यांनी भरत जोशी यांना 2100 ग्रॅम सोन्याची बिस्किटे घेऊन पाठवले. भरत जोशी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचल्यानंतर सरदाराच्या वेशात आलेल्या व्यक्तीने सोन्याचा सौदा करायचा असल्याचे सांगितले. तिथे तिघे बसले होते. भरत जोशी यांना 1.30 कोटी रुपयांच्या नोटांनी भरलेली बॅग दिली आणि बाकीचे 30 लाख रुपये मित्र आणत असल्याचे सांगून दोघे निघून गेले. जोशी यांनी नोटा मोजण्यास सुरुवात केली असताना तिसरी व्यक्तीही गायब झाली. नोटा मोजताना त्या बनावट असल्याचे आढळून आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

अनुपम खेर म्हणाले, काहीही होऊ शकते

या बनावट नोटांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अभिनेते अनुपम खेर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. लो जी कर लो बात… पाँच सो के नोट पर गांधीजी की जगह मेरी पह्टो? कुछ भी हो सकता है… असे अनुपम खेर यांनी म्हटले आहे.