‘लाडकी बहिण’ ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका

नांदेड जिल्ह्यातील मनाठा येथे लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या आधार कार्डमध्ये काही फेरफार करत त्यांचे पैसे सीएससी केंद्र चालकाने परस्पर हडप के्ल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे पुन्हा लाडकी बहिण योजनेतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला असून त्यावरून सध्या विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून राज्य सरकारला फटकारले आहे. ”सरकारी योजना लोकांच्या फायद्याऐवजी राजकीय फायद्यासाठी जेव्हा आणल्या जातात तेव्हा त्या पापाचे वाटेकरी होण्यासाठी बिळातून अनेक साप बाहेर येतात. लाडकी बहिण योजनेसंदर्भात समोर आलेला हा दुसरा घोटाळा आहे. योजनांच्या प्रचारासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातोय, त्याच्या प्रचारसभेत लोकांना आणण्यासाठी पैसे वाटले जातायत आणि आमच्या बहिणींच्या बँक खात्यात जे पैसे जमा व्हायला हवेत त्यावर तिसरंच कुणीतरी डल्ला मारतंय. ही संपूर्ण योजनाच भ्रष्टाचाराचं कुरण आहे”, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकाने महिलांच्या आधार कार्डमध्ये बदल करून महिलांचे पैसे आधी त्यांच्या पतीच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सदर रक्कम त्याने परस्पर हडप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाखोंचा घोटाळा करून सदर सीएससी सेंटर चालक गावातून पसार झाला आहे.