सरकार ‘विषकन्या’ ज्याच्याजवळ जाते त्याला बुडवते! गडकरींचा स्वपक्षावरच हल्ला

आपल्या रोखठोक भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत असणारे भाजपचे नेते, खासदार नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारवर हल्ला केला आहे. ‘‘सरकार म्हणजे विषकन्या आहे. सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. कारण ही विषकन्या ज्याच्या जवळ जाते त्याला बुडवते,’’ असे ते म्हणाले. शिवाय सबसिडीसाठी सरकारच्या भरवशावर राहू नका, असा सल्ला देतानाच ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडत असून योजनांच्या अनुदानाच्या पैशांची आता शाश्वती नाही, असे गडकरी म्हणाले.

माजी पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूरमध्ये आयोजित ‘अॅडव्हेंटेज विदर्भ’ कार्यक्रमात बोलताना उद्योजक आणि गुंतवणूकदारांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, सरकार कुणाचेही असो. सरकारच्या भरवशावर राहू नका. सरकारला तुमच्यापासून दूर ठेवा. सरकार ही विषकन्या असते. ज्याच्या जवळ जाते त्याला बुडवते. त्यामुळे उद्योजकांनी या लफडय़ात पडू नये. सबसिडी घ्यायची असेल तर घ्या. पण सबसिडी कधी मिळेल याचा भरवसा नाही. माझ्या मुलाने सांगितले की त्याला 450 कोटी रुपये अनुदान मिळाले आहे. मुलाला मी विचारले हे अनुदान कधी मिळणार? हे अनुदान मिळण्यासाठी देवाला प्रार्थना कर. कारण सरकारचा काहीही भरवसा नाही अनुदान मिळणार की नाही याचा, असेही गडकरी म्हणाले.

विदर्भात 500 हजार गुंतवायला कुणीही तयार नाही

विदर्भात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण अपेक्षित यश मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. विदर्भात 500 हजार कोटींची गुंतवणूक करण्यास कोणीही तयार नाही, असेही ते म्हणाले. अनुदानाविषयी बोलताना गडकरी यांनी राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर अप्रत्यक्षरीत्या टीकाच केली. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडत आहे. विविध योजनांच्या अनुदानाचे पैसे त्या योजनेसाठी द्यावे लागत असल्याचेही ते म्हणाले.