कोल्ड प्ले या जगप्रसिद्ध म्युझिकल बँडचा कॉन्सर्ट जानेवारीत हिंदुस्थानात होणार आहे. या कॉन्सर्टचे 3500 हजार रुपयांचे तिकीट तब्बल 70 हजार रुपयांना विकल्याचे उघड झाल्यानंतर ‘बुक माय शो’वर तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी बुक माय शो अॅपचे सीईओ आणि सहसंस्थापक आशीष हेमराजानी यांना 27 सप्टेंबर रोजी समन्स बजावले होते, मात्र ते पहिल्या समन्समध्ये तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले नाहीत. आता त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी त्यांना रविवारी पुन्हा समन्स बजावले. यापूर्वी 25 सप्टेंबरला बुक माय शोने कोल्डप्ले कॉन्सर्टची बनावट तिकिटे विकणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. बुक माय शो हे कोल्डप्लेच्या म्युझिक शोच्या तिकिटांच्या विक्रीसाठी आणि पुनर्विक्रीसाठी Viagogo व GigWerg आणि कोणत्याही थर्ड पार्टीशी जोडलेले नाही, असे कंपनीने म्हटले होते. तिकीट विक्रीच्या नावाखाली मनी लॉण्डरिंग आणि 500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.