Uttarakhand Accident – चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांची बस उलटली, 12 जखमी

चमोलीमध्ये बद्रीनाथ हायवेवर भाविकांनी भरलेली बस उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात 12 भाविक जखमी झाले आहेत. तर तिघांची अवस्था गंभीर आहे.जेपी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.  सर्व भाविक बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊन परतत होते. त्यावेळी हा अपघात झाला.

अपघात ज्या ठिकाणी झाला तिथला रस्ता खडबडीत आणि अरुंद आहे. सुदैवाने गाडी उलटून खड्ड्यात पडली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. गोविंदघाट पोलीस विनोद रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालमधील 18 भाविकांचा एक गट 24 सप्टेंबर रोजी केदारनाथ आणि बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी ऋषिकेशला गेले होते. तिथून सर्वांनी मिनी बस बुक केली आणि सर्व बाबा केदार यांच्या दर्शनाला निघाले. सोमवारी भाविक बद्रिनाथ धाम येथे पोहेचले आणि भगवान नारायणाचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास तेथून निघाले. बस जेपी जलविद्युत प्रकल्पाजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

पोलिसांनी सर्व जखमींना जवळच्या जेपी रुग्णालयात नेले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या तिघांना जोशीमठ सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.