शनिवार व रविवार अशा सुट्टीचा आनंद घेवूनही सोमवारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात न येणाऱ्या लेटलतिफ कर्मचारी व अधिकारी यांना वेळेत येण्यासाठी समज देण्यात येईल अशी माहिती डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कुलसचिव डॉ. प्रदीप हळदणकर यांनी पत्रकारांना दिली.
दापोली येथे मुख्यालय असलेल्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 अशी आहे मात्र कुलगुरू कार्यालय असलेल्या इमारतीमधील कर्मचारी हे सकाळी 9 वाजता कार्यालयात येत नसल्याची माहिती दापोलील पत्रकारांना मिळाल्यावर त्यांनी आज सकाळी 9 वाजता हे कार्यालय गाठले. अनेक कर्मचारी सकाळी 9.10 ते 9.30 या वेळेत या कार्यालयात येत असल्याचे पत्रकारांना दिसून आले. हा सर्व प्रकार या कार्यालयाच्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित होत असूनही त्याचे भय या कर्मचाऱ्यांना नसल्याचेही निदर्शनास आले. कोविड संपून चार वर्षे झाली तरी या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविणारी बायोमॅट्रिक यंत्र अद्यापही सुरु करण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांची उपस्थिती, हजेरी रजिस्टरवर नोंदिवण्यात येत असल्याने त्याचा फायदा या उशिरा येणाऱ्या कर्मचार्याना होत असल्याचे दिसून आले.
कार्यालयात उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये उपकुलसचिव, सहाय्यक कुलसचिव तसेच अधीक्षक दर्जाचे अधिकारी असल्याने अन्य कर्मचारीही त्यांचा उशिरा येण्याचा किता गिरवत होते. विद्यापीठाचे प्रशासन सांभाळणाऱ्या कुलसचिव कार्यालयात आज 9.15 वाजता एकही अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित नव्हता.
या संदर्भात पत्रकारांनी कुलसचिव डॉ. प्रदीप हळदणकर यांची भेट घेवून त्यांना उशिरा येणाऱ्या लेट लतीफ कर्मचारी यांचेवर कारवाई करणार का असे विचारले असता, सीसीटीव्ही मध्ये झालेले चित्रीकरण पाहून उशिरा आलेल्या कर्मचारी वर्गाला योग्य ती समज देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सध्या विद्यापीठात 50 टक्के कर्मचारी कमी असून, आहेत त्या कर्मचारी वर्गावर अतिरिक्त कामाचा भार पडत असल्याने अनेक कर्मचारी हे कार्यालयीन वेळ संपल्यावरही थांबून आपले काम पूर्ण करत असल्याचे डॉ. प्रदीप हळदणकर यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी लवकरच कार्यालयीन वेळ बदलण्यात येणार असून ती अन्य शासकीय कार्यालयाप्रमाणे सकाळी 9.45 ते 6.15 अशी करण्यात येईल त्यामुळे कर्मचारी वेळेत कार्यालयात येतील तसेच कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविणारी बायोमॅट्रिक यंत्रणाहि लवकरच कार्यान्वित करण्यात येईल अशी माहितीही कुलगुरू डॉ. भावे यांनी पत्रकारांना दिली.