बिहारमध्ये महापूर! गंडक, कोसी नद्यांचे रौद्ररुप, 13 जिल्ह्यांना फटका; पुराने नागरिक बेहाल

बिहारमध्ये सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. घरं, रस्ते, पूल, इमारती सगळीकडे पाणीच पाणी आहे. शेकडोजण बेघर झाले आहेत. नजर जाईल तिथे पाणीच पाणी दिसत असून ही परिस्थिती बिहारच्या 13 जिल्ह्यांमध्ये आहे. गावांना बेटाचे स्वरुप आले असून लोक छतावर अडकले आहेत. नागरिकांना 2008 च्या भीषण महापुराची भिती सतावू लागली आहे.

बिहारमधील गंडक, कोसी, बागमती, कमला बालन आणि गंगा यांसह अनेक नद्यांना पूर आला आहे. लाखो लोकांचे जीवन संकटात आहे. 2008 ची भीती लोकांना सतावू लागली आहे. खरे तर बिहारमध्ये 2008 च्या खुणा अजूनही आहेत. सरकारी आकडेवारीनुसार 2008 मध्ये आलेल्या भीषण पुरामुळे 526 लोकांचा मृत्यू झाला होता. शेतात वाळू भरल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेत कायमचे उद्ध्वस्त झाले. त्यावेळी नेपाळमधून 2-3 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. पण यावेळी अधिक धोका असल्याचे बोलले जात आहे. कारण कोसी नदीवरील बीरपूर (नेपाळ) बॅरेजमधून 6.61 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. जे 56 वर्षातील सर्वाधिक आहे. 22008 च्या तुलनेत ते जवळपास 3 पट आहे. त्याच वेळी, हा आकडा 1968 मध्ये 7.88 लाख क्युसेक नंतरचा सर्वात मोठा आहे. त्याचबरोबर गंडकवरील वाल्मिकीनगर बॅरेजमधून 5.62 लाख क्युसेक पाणी सोडण्यात आले असून, 2003 नंतरचे सर्वाधिक आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, बक्सर, भोजपूर , सारस, पटणा, समस्तीपुर, बेगूसराय, मुंगेर आणि भागलपूर सहित गंगाच्या किनाऱ्यावरील 13 जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसानंतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सखल भागात राहणारे सुमारे 13.5 लाख लोक बाधित झाले आहेत. बाधित जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना मदत छावण्यांमध्ये नेण्यात आले आहे. मुजफ्फुरपुरच्या कटरा येथील बकुरी पावर प्लांटमध्ये पाणी घुसले आहे. अनेक रस्ते जलमय झाले आहेत. पुल वाहून गेले आहेत. लोकांच्या घरात पाणी घुसले आहे. गावाची गाव पाण्याने भरली आहेत. त्यांना तिथून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.