बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे आज अखेर उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आले. एन्काऊंटर झाल्याच्या घटनेस सहा दिवस उलटल्यानंतर अंत्यसंस्काराच्या जागेचा तिढा सुटला. यावेळी अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अक्षयच्या निवडक नातेवाईकांसह काही वरिष्ठ पोलीस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. दफन प्रक्रियेचे संपूर्ण व्हिडीओ चित्रीकरण पोलिसांनी केले.
अक्षय शिंदे याला तळोजा तुरुंगातून ठाण्याला आणले जात असताना त्याचे मुंब्रा बायपासवर 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर करण्यात आले. जे. जे. हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणला होता. बदलापूर तसेच अंबरनाथमधील नागरिकांनी अक्षयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू देण्यास विरोध केला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आज संध्याकाळी पाचच्या सुमारास त्याचा मृतदेह शांतीनगर येथील स्मशानभूमीत आणला.
अक्षयच्या मृतदेहाचे उल्हासनगरमध्ये दफन करणार असल्याचे समजताच मिंध्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव शांतीनगर स्मशानभूमीबाहेर जमला. एवढेच नव्हे तर काही जणांनी दफनविधीसाठी खोदलेला खड्डाही बुजवला. यावेळी पोलिसांसोबत बाचाबाची व घोषणाबाजी झाली. मात्र पोलिसांची जादा पुमक तातडीने दाखल झाली व विरोध करणाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने स्मशानभूमीतील बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्यात आला. त्यानंतर अक्षयच्या मृतदेहावर त्याच्या जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दफनविधी केला गेला.
स्मशानभूमीला छावणीचे स्वरूप
अतिरिक्त आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी, सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, अनिल पडवळ, अनिल जगताप यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांचा वादविवाद झाला. शांतीनगर स्मशानभूमीच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
आव्हाडांनी केली ऑडिओ क्लिप व्हायरल
पोलिसांनी अक्षयच्या केलेल्या एन्काऊंटरवर अनेकांनी संशय व आक्षेप घेतले असतानाच आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप एक्स पोस्टवर व्हायरल केली आहे. ज्या व्हॅनमध्ये अक्षयचा एन्काऊंटर झाला त्याच्याच मागे एका व्यक्तीची गाडी होती. फायरिंगचा आवाज येताच त्याला वाटले की गाडीचा पाटा तुटला असावा. तेवढ्यात पुन्हा पोलिसांच्या गाडीतून आवाज आला. त्यामुळे गाडीचालकाचा संशय आणखी वाढला. हा प्रकार सुरू होता तेव्हा पोलिसांच्या गाडीला पडदे असल्याचे त्या व्यक्तीला दिसले, असा दावाही या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.