आयपीएलमध्ये धोनी झाला चार कोटींचा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असल्याचा फटका

आयपीएलच्या लिलावाचा बोलबाला सुरू व्हायला अजून काही अवधी बाकी आहे. पण आयपीएलची हवा आतापासून जोर धरू लागली असून बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आयपीएलच नव्हे तर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा ‘गोट’ अर्थातच सार्वकालिक महान क्रिकेटपटू असलेला महेंद्रसिंग धोनी चक्क सामान्य क्रिकेटपटू झाला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचे मूल्य अवघे चार कोटींचे झाले आहे.

बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार जो क्रिकेटपटू पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला असेल, एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नसेल, त्या खेळाडूला अनकॅप म्हणजेच सामान्य क्रिकेटपटू मानले जाईल आणि अशा सामान्य क्रिकेटपटूला पुन्हा आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी त्यांच्या फ्रेंचायझीजला केवळ चार कोटी रुपये मोजावे लागणार आहे. याचा थेट फायदा चेन्नई सुपरकिंग्जला होणार आहे. चेन्नईला धोनीला आपल्या संघात कायम ठेवण्यासाठी फार मोठी रक्कम मोजावी लागणार नाही. त्यामुळे त्यांची खूप मोठी बचत होणार आहे.

सारे काही धोनीसाठीच ?

यात किती तथ्य आहे याची कल्पना नाही. मात्र किमान पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या क्रिकेटपटूला अनकॅप खेळाडूचा दर्जा केवळ धोनीला चेन्नई संघात कायम ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. हिंदुस्थान आणि आयपीएलचा सार्वकालिक महान कर्णधार असलेला धोनी 2019 च्या आयसीसी वर्ल्ड कप उपांत्य सामन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच तो बीसीसीआयच्या कोणत्याही करारबद्ध खेळाडूंच्या यादीतही नाही. त्यामुळे हा महान खेळाडू केवळ बीसीसीआयच्या या नव्या नियमामुळे नावापुरता सामान्य क्रिकेटपटू झाला आहे. आता आयपीएलमध्ये सहा खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. 2022 च्या लिलावादरम्यान एका संघात केवळ चार खेळाडूंनाच रिटेन म्हणजेच कायम ठेवण्याची मंजुरी देण्यात आली होती.

31 ऑक्टोबरपर्यंत द्यावी लागणार यादी

आपल्या संघात कोणते खेळाडू कायम ठेवले जाणार आहे यांची अंतिम यादी 31 ऑक्टोबरपूर्वी जाहीर करावी लागणार आहे. एपंदर सहा खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी मंजुरी देण्यात आली असून त्यात पाच आंतरराष्ट्रीय खेळाडू (देशी आणि विदेशी) आणि दोनपेक्षा अधिक अनकॅप हिंदुस्थानी खेळाडू नसावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच 31 ऑक्टोबरपूर्वी जो खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करेल, त्यालाही कॅप खेळाडू मानले जाईल.

इम्पॅक्टचा नियम 2027 पर्यंत

गेल्या वर्षी आयपीएलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर अमलात आणलेला इम्पॅक्ट प्लेअरचा नियम 2027 च्या आयपीएलपर्यंत कायम राहील. सामन्याच्या परिस्थितीनुसार आपल्या खेळत असलेल्या 11 खेळाडूंमध्ये फलंदाज आणि गोलंदाज बदलण्यास परवानगी देणाऱया या नियमामुळे अनेक वादविवाद झाले होते. पण अनेक फ्रेंचायझीजने या नियमाला पाठिंबा दर्शवल्यामुळे इम्पॅक्टचा प्रभाव 2027 पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे आगामी आयपीएलमध्येही गोलंदाजांची धू धू धुलाई पक्की आहे.