कृषी पुरस्कारासाठी आलेल्या शेतकऱ्यांना जेवण नाही, गलिच्छ हॉटेलात परवड; मिंधे सरकारच्या हलगर्जीपणामुळे मुंबईत विजेत्यांचे हाल

मिंधे-भाजप सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे मुंबईत कृषी पुरस्कारासाठी आलेल्या विजेत्यांची प्रचंड परवड झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या शेतकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था अत्यंत अस्वच्छता असणाऱ्या हॉटेलमध्ये करण्यात आली, तर काही हॉटेल व्यवस्थापनांनी शेतकऱ्यांना जेवण देण्यासही नकार दिला, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून जेवणाच्या बिलांची मागणी करण्यात आली. या अवमानकारक वागणुकीमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कारांचा वितरण सोहळा रविवार, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (डोम) येथे आयोजित केला आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित राहणार आहेत. मात्र या पुरस्काराच्या केंद्रस्थानी असलेल्या पुरस्कार विजेत्या बळीराजाची परवड झाली. खोल्यांमध्ये अतिशय दुर्गंधी येत होती. या हॉटेलमध्ये  कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या. या प्रकारामुळे पुरस्कार विजेते संतप्त झाले.

भाजप किसान मोर्चाचा हलगर्जीपणाच जबाबदार

या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी भाजप किसान मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याच्या इव्हेंट कंपनीकडे आहे. कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रदर्शनाच्या आयोजनाची सर्व कंत्राटे भाजपच्या या लाडक्या कंत्राटदारालाच मिळतात असे समजते. या पुरस्कार वितरण सोहळय़ासाठी सुमारे साडेचारशे पुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय आले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था या इव्हेंट कंपनीने अतिशय निकृष्ट दर्जाच्या हॉटेलमध्ये केली.