मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, हायकोर्टात याचिका; मुस्लिमद्वेष असल्याचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार नितेश राणे मुस्लिमद्वेषी आहेत. भडकाऊ भाषणे करणाऱ्यांची ते पाठराखण करतात. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कट व अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी फौजदारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

वांद्रे येथील मोहम्मद सईद यांनी अ‍ॅड. एजाज नख्वी यांच्यामार्फत ही याचिका केली आहे. मुख्यमंत्री शिंदे, आमदार राणे, रामगिरी महाराज, हिंदू जनजागृती समिती, गुगल, ट्विटर, पोलीस महासंचालक व अन्य यांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

राजकीय स्वार्थासाठी द्वेष पसरवला जातोय

भडकाऊ भाषण करणे हा गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याची सक्त ताकीद मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिसांना दिली आहे. मुस्लिम द्वेषी मेसेज जाणीवपूर्वक पसरवले जात आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावे

2022मध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जिह्यात हा मोर्चा निघाला. या मोर्चांमधून मुस्लिमांवर नाहक आरोप करण्यात आले. मुस्लिमविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. या सर्वांची पाठराखण केली जात आहे. मात्र समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

याचिकेतील मागण्या

मुख्यमंत्री शिंदे, आमदार राणे व रामगिरी महाराज यांची मुस्लिमविरोधी भाषणे सोशल मीडियावरून काढून टाकावी.
मुस्लिमांना टार्गेट करणारे मोर्चे, आंदोलने यांचे लाइव्ह टेलिकास्ट न करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत.
मुस्लिमविरोधी भाषणे, मेसेज पसरवले जाणार नाहीत, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जावीत.
मुस्लिमविरोधी रॅली व मोर्चांची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर निश्चित करावी.
भडकाऊ वक्तव्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.