गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उमेदवार का दिला हे लोकांसमोर मांडावं लागेल! निवडणूक आयोगाने स्पष्ट केले

खोके-पेटय़ांचे वाटप, खून, मारामाऱ्या आणि भाईगिरीच्या जोरावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत चाप बसणार आहे; कारण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला  उमेदवार का दिला याचे स्पष्टीकरण राजकीय पक्षांना जाहिरातीच्या माध्यमातून द्यावे लागेल, तर निवडणूक रिंगणात असलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांनाही त्यांच्या गुह्यांची कुंडली तीन वेळा जाहिरातीच्या माध्यमातून मतदारांसमोर मांडावी लागेल. मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराची निवड आपण करावी का याचा निर्णय मतदार घेणार आहेत. दरम्यान, तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांचा कोणताही मुलाहिजा न राखता बदली करण्याचे आदेशही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन  दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने या दौऱ्यात विविध अकरा राजकीय पक्ष तसेच पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, राज्य निवडणूक अधिकारी तसेच अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून संपूर्ण आढावा घेतला. त्यानंतर आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संपूर्ण माहिती दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते सुभाष देसाई व खासदार अनिल देसाई यांनी मतदारांच्या सुविधांबाबत सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की मतदान केंद्रावर रांगा लागल्या असतील मतदारांना बसण्यासाठी खुर्चा, टेबल यांची व्यवस्था केली जाईल. पाणी, पंखे सुविधा पुरवल्या जातील.

जी पेमेंटवर लक्ष

निवडणुकांच्या काळात पैसे, दारु वाटप ड्रग्ज मोठय़ा प्रमाणावर होते. या काळात जी पेव्दारे होणाऱ्या संशयास्पद व्यवाहारांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे.

शहरात मतदान कमी

जम्मू कश्मीरमध्ये  विधानसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदान सरासरी 70 टक्क्यांच्या आसपास झाले. राज्यात लोकसभा निवडणुकीत गडचिरोलीत 73 टक्के मतदान झाले पण लोकसभेत मुंबईत कुलाब्यात 40 टक्के, कल्याणध्ये 41 टक्के, पुणे कँटाँनमेंटमध्ये 43 टक्के, मुंबादेवीत 44 टक्के आणि कुर्ल्यात 44 टक्के इतके कमी मतदान झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

रश्मी शुक्लांबाबत आचारसंहितेनंतर निर्णय?

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात लेखी तक्रारी आल्या आहेत.  पण वैयक्तीक तक्रारींवर पत्रकार परिषदेत चर्चा होत नाही. पण महाराष्ट्रात निवडणूक आचारसंहिता लागू झालेली नाही  जेव्हा लागू होईल… आयुक्त राजीव कुमार यांनी अर्धवटच सोडले आणि योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, मुदतवाढ दिलेले अधिकारी असोत किंवा कंत्राटी पध्दतीवरील कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही असा इशाराही दिला.

महाराष्ट्रात विधानसभा

एकूण मतदारसंघ          288

सर्वसामान्य                  234

एसटी                           25

एससी                          29

मतदारांची संख्या          9 कोटी 59 लाख

पुरुष मतदार                 4 कोटी 95 लाख

महिला मतदार              4 कोटी 64 लाख

85 वर्षांच्या वरील मतदार           12 लाख 48 हजार

100 वर्षांवरील मतदार  49 हजार 34

प्रथमच मतदान करणारे 19 लाख 48 हजार

मतदान केंद्रांची संख्या   1 लाख 86 हजार

शहरी भागातील केंद्रांची संख्या    42 हजार 585

ग्रामीण भागातील केंद्राची संख्या 57 हजार 601

मतदानासाठी भरपगारी रजा

लोकसभा निवडणुकीत रायगड जिह्यात कामगारांना भरपगारी रजा दिली नव्हती. त्यामुळे मतदानावर परिणाम झाला होता याकडे आयोगाचे लक्ष वेधले असता, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, खास करून असंघटित कामगारांना भरपगारी रजा देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत.

सणवार आणि मतदान

दिवाळी, देवदिवाळी, छठपूजा अशा विविध सणांच्या तारखा लक्षात घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्याची विनंती राजकीय पक्षांनी केली आहे. त्यामुळे सण आणि सुट्टय़ांमुळे मतदार बाहेर जाणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

उमेदवाराने स्वतःवरील गुन्हय़ांच्या तीन जाहिराती प्रसिद्ध करणे बंधनकारक

मतदाराना उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाणून घेण्याचा हक्क आहे. म्हणूनच उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर तीन दिवसांच्या आत प्रत्येक उमेदवाराला वर्तमानपत्र व टीव्हीवर जाहिरात देऊन त्याच्या विरोधात कोणत्या स्वरूपाच्या गुन्हेगारीच्या केसेस आहे याची माहिती तीन वेळेस प्रसिद्ध करावी लागेल. आपण दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात कोणत्या स्वरूपाच्या गुन्हेगारी केसेस आहेत त्याची माहिती राजकीय पक्षांनाही प्रसिद्ध करावी लागेल. संबंधित उमेदवारालाच का उमेदवारी दिली आणि त्या मतदारसंघात अन्य उमेदवार का दिला नाही हे राजकीय पक्षांना स्पष्ट करावे लागेल, मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला निवडून द्यायचे अथवा नाही याचा निर्णय मतदाराच घेतील, असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

हेलिकॉप्टर विमानांची कसून तपासणी

लोकसभेच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधून संशयास्पद बॅगा उतरवल्याचा व्हीडीओ शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केला होता. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले की, विधानसभा निवडणुकांच्या काळात हेलिकॉप्टर  व विमानाने प्रवास करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टर व विमानांची कसून तपासणी केली जाणार आहे.  तपासणी करताना अजिबात घाबरू नका अशा सूचना दिल्या आहेत.

बदल्यांमध्ये कोणाचीही गय नाही

तीन वर्षापेक्षा अधिक कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत तसेच गृह जिह्यातल्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या जातील. तीन वर्षांचा कार्यकाल झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचे प्रमाणपत्र राज्याचे मुख्य सचिव व  पोलीस महासंचालकांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बदल्यांमध्ये कोणाचीही गय आणि अपवाद केला जाणार नाही तसेच  निवडणुकीच्या कामात हस्तक्षेप आणि दबाव टाकणाऱ्यांची गय होणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.