मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मागतायत रस्त्यावर भीक! ‘माझं लातूर’ परिवाराच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा

लातूर जिल्हा रुग्णालयाचा रखडलेला प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अशी आग्रही मागणी करीत, माझं लातूर परिवाराने चक्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पालकमंत्री गिरीष महाजन, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांचे मुखवटे घालत भीक मागून निधी गोळा केला. या अनोख्या प्रतीकात्मक आंदोलनाने लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले.

शहरातील गांधी चौक येथून सकाळी 10.30 च्या सुमारास या प्रतीकात्मक भीक मागो आंदोलनास सुरुवात झाली. माझं लातूर परिवारातील सदस्यांनी यावेळी मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे मुखवटे घातले होते. जिल्हा रुग्णालय झालेच पाहिजे अशा घोषणा देत व्यापारी, सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून जिल्हा रुग्णालयासाठी भीक मागण्यात आली. गांधी चौक, बसस्थानक, हनुमान चौक ते गोलाई पर्यंत हे आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर असूनही प्रलंबित असलेला लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माझं लातूर परिवाराने 2 ऑक्टोबर 2023 पासून शासनदरबारी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली होती. बेमुदत साखळी उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले. चक्क मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पालकमंत्री यांना साकडे घातले. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी विनंती केली होती.

अखेर 19 जून 2024 रोजी राज्य सरकारने आदेश काढून कृषी महाविद्यालयाची 10 एकर जागा 3 कोटी 32 लाख 68 हजार 650 रुपये कृषी विभागास वर्ग करून ताब्यात घ्यावी असे निर्देश दिले. विशेष म्हणजे ही प्रक्रिया 60 दिवसात पूर्ण करावी असा स्पष्ट उल्लेख शासन आदेशात करण्यात आला. मात्र दुर्दैवाने ही मुदत संपून 1 महिना उलटून गेला आहे. या संपूर्ण विषयाची सविस्तर माहिती वेळोवेळी पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांना माझं लातूर परिवाराच्या वतीने प्रत्यक्ष भेटून, निवेदन सादर करून आणि ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. शासनाकडे लातूर जिल्हा रुग्णालयासाठी 3 कोटी निधी उपलब्ध नाही का? असा प्रश्न विचारत. शुक्रवारी (28 सप्टेंबर 2024) शहरात प्रतीकात्मक मुखवटे घालून निधी गोळा करण्यात आला. उद्या 29 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिल्ह्यातील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधींचे मुखवटे घालून निधी जमा करण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाच्या या आंदोलनात लातुरच्या सर्व सुजाण नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. आजच्या आंदोलनात परिवारातील पत्रकार, संपादक, समाजसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.