रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मोगाब्लॉक; अनेक फेऱ्या रद्द

रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान काही ट्रेन उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक तपासण्याची सूचना रेल्वे प्रशासनाने केली आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. हा ब्लॉक रविवारी सकाळी 11.05 पासून ते दुपारी 03.55 पर्यंत असणार आहे. धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. ब्लॉक कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांदरम्यान कोणतीही लोकल धावणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वेकडून नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी अंधेरी – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री 12.30 ते रविवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत10 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत सर्व लोकल गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तर हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊ मार्गावर रविवारी सकाळी 11.10 पासून ते दुपारी 04.10 पर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांच्या सेवेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल / वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.