किस्से आणि बरंच काही- चतुरस्र कलावंत

>> धनंजय साठे

स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्याची लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी’मधील राजश्री ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रसिका विजय धामणकर. रसिकाची व माझी संगीत हीच आवड असल्याने आमची छान मैत्री झाली जी आजही तशीच टिकून आहे.

रसिका विजय धामणकर हिने मनोरंजन क्षेत्रात गेल्या 12 वर्षांत ‘पुरुष’, ‘गारंबीचा बापू’, ‘ती फुलराणी’सह सात नाटके व ‘सूर्या’, ‘एक कुतुब तीन मिनार’, ‘जय भवानी’सह सहा मराठी आणि एक कन्नड चित्रपट, तसेच ‘एक होती राजकन्या’, ‘प्रेम पॉयझन पंगा’, ‘विठू माऊली’सारख्या टीव्ही मालिका केल्या. सध्या स्टार प्रवाहवर ‘लग्नाची बेडी’मध्ये ती राजश्री रत्नपारखी ही भूमिका करतेय व या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.

सागर युनिव्हर्सिटीमधून तिने एमए, मुंबई युनिव्हर्सिटीमधून एमएड, तर खैराग युनिव्हर्सिटीमधून बॅचलर इन म्युझिक म्हणजेच संगीत विशारद पूर्ण केले असून गेली 30 वर्षे संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. त्याचबरोबर गेल्या 16 वर्षांपासून डीएड आणि बीएड कॉलेजला सहायक प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती. सध्या गायनाचे ऑनलाइन वर्ग घेते. देश-विदेशातील 15 विद्यार्थी तिच्याकडे शिकत आहेत. चतुरस्र कलानिपुण-2020, राज्यस्तरीय कलागौरव-2023, धर्मपीठ पुरस्कार-2023 आणि भारत निर्माण योगदान-2024 या पुरस्कारांनी ती सन्मानित झाली आहे.

लग्नापूर्वी रसिका संगीत शिक्षिका होती. लग्नानंतर मुंबईत आल्यावर वर्षभरात मुलगी अंतराचा जन्म झाला. त्याच दरम्यान रसिकाच्या पतीची गोव्याला बदली झाली. ते तेव्हा नौदलात नोकरी करत होते. सहा वर्षे गोव्यात संगीत शिक्षिका म्हणून तिने नोकरी केली. नंतर पुन्हा मुंबईला शिफ्ट झाल्यावर मुलगा केदारचा जन्म झाला. केदार जवळपास तीन वर्षांचा झाल्यावर रसिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. घरी सासूबाईंचा भक्कम आधार असल्यामुळे रसिका मान्य करते की, तिला निश्चितपणे अभिनयावर फोकस करायला मिळाला. रसिकाने बीएच आणि एमएडही पूर्ण केले व त्याच कॉलेजात तिला असिस्टंट प्रोफेसरची नोकरी मिळाली. कॉलेजच्या प्रिन्सिपॉल, सासूबाईंचे सहकार्य व मुले, घर, अभिनय आणि संगीत हे सगळे सांभाळताना तिची तारांबळ व्हायची तरी तिने निभावले. कारण सगळ्या गोष्टींचा योग्य प्रकारे बॅलन्स साधला, तर दोन्हीसाठी वेळ देता येतो हे रसिकाने उत्तम प्रकारे सिद्ध केले आहे.

तर आमची सहाएक वर्षांपूर्वी ओळख झाली आणि संगीत हा एक कॉमन दुवा असल्यामुळे आमची मस्त मैत्री झाली. लॉकडाऊनमध्ये संपर्क नव्हता. तो सरताना आम्ही ‘कराओके’ शोजमध्ये एकत्र गायलो आणि तेव्हा समजले की, रसिका अनेक ठिकाणी गाण्याचे शोज करत असते, तर तिने स्वतचा ग्रुप का सुरू करू नये? असा विचार मनात डोकावला. तसं ती नादब्रह्म म्युझिक अकादमीतर्फे ऑनलाइन शिकवत होतीच. त्यामुळे ग्रुप सुरू करणं बऱयापैकी सोप्पं गेलं. नादब्रह्म म्युझिक अकादमीचा पहिला शो 20 जुलैला झाला. नंतर 21 जुलैला आमचा पहिला एकत्रित शो कुवेगा म्युझिक ऑडिटरियम, ठाणे येथे संपन्न झाला.
या छोटय़ाशा अवधीत रसिकाच्या धडाडी वृत्तीमुळे नादब्रह्म म्युझिक अकादमीचे तीन शोज यशस्वीरित्या पार पडले. आता पुढच्या तीन शोचे नियोजन चालू आहे. पडद्यावरच्या रसिकाच्या सात्त्विक, सरळ, मनमिळाऊ प्रतिमेला भुरळ पडेल इतकी धम्माल-मस्ती रसिका आमच्या गाण्याच्या शोजमध्ये करते. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या सासूबाई ‘लग्नाची बेडी’ ही मालिका नेमाने पाहतात. त्यातल्या राजश्रीच्या भूमिकेत रसिकाला पाहायची सवय झाल्यामुळे आमच्या शोमध्ये गाणी गाणारी, नृत्य करणाऱया रसिकाचे नृत्यकौशल्य पाहून सासूबाई अचंबित झाल्या आणि त्यांच्याकडून सहज उद्गार निघाले, “अरे वा, एका व्यक्तीत किती कलागुण असू शकतात?’’ अशीच देवाची कृपा राहू दे नेहमी तिच्यावर. माझ्यावर माझ्या आईनंतर इतके हक्काने, आपुलकीने “तू काय डोक्यावर पडलास का? गप्प बस आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष दे’’ असं बोलणारी फक्त रसिकाच!

माझ्या गोड मैत्रिणीचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे ती उत्तम जेवण बनवते आणि दुसऱयांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळतो यात शंका नाही. अजून एक गोष्ट ती एक अतिशय प्रेमळ आई आहे. मुलगी अंतरा परदेशात शिक्षण घेत असल्यामुळे माझा प्रत्यक्ष अनुभव नाही, पण मुलगा केदारला भेटल्यावर तो अतिशय हुशार, समजूतदार तसंच त्याच्यावर उत्तम संस्कार झाल्याचा मूर्तिमंत साक्षात्कार घडतो.

आता एक गोष्ट मी रसिकाची परवानगी घेऊन तुमच्या बरोबर शेअर करू इच्छितो आणि ती म्हणजे, सार्थ फाऊंडेशन ही हिंगोलीची एक संस्था आहे, जी आत्महत्या केलेल्या शेतकऱयांच्या निराधार मुलांचे संगोपन करते. त्यांच्या राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य काळजी घेते, तर या संस्थेशी रसिका 2020 पासून जोडली गेलेली आहे. ती तिच्या परीने योग्य ते साहाय्य वेळोवेळी करत असते. ही गोष्ट खरं तर रसिकाला कुठेही बोललेली आवडत नाही. कारण तिच्या मते डाव्या हाताचे उजव्या हातालाही कळता काम नये. तिचं म्हणणं असं की, हे समाज कार्य ती तिच्या स्वखुशीने करते. पण तिला मी समजावून सांगितले, ती आज देवाच्या कृपेने अशा स्थानावर आहे की, तिने केलेली एखादी गोष्ट चार लोकांनी वाचली किंवा ऐकली तर अनेक लोकांना स्फूर्ती आणि प्रेरणा मिळेल. त्या नैतिक कार्याला अजून हातभार लागेल असं माझं प्रामाणिक मत आहे, तर अशा या माझ्या गुणी, मेहनती मैत्रीण रसिका हिच्याकडून उत्तमोत्तम काम होत राहो हीच देवाकडे प्रार्थना.

[email protected]