पोक्सो गुन्ह्याशी संबंधित कोणताही तपशील उघड करणे कायद्याने गुन्हा असतानाही मिंधे गटाचा शहरप्रमुख वामन म्हात्रे याने बदलापुरातील चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या या गुन्ह्याची एफआयआर कॉपी सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे पीडित मुलींची ओळख जगजाहीर झाली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत धाव घेऊन वामन म्हात्रेवर पोक्सो दाखल करण्याची मागणी केली. त्याचे पुरावेही दिले. पोलिसांनी पीडित मुलीच्या आईचा तक्रार अर्ज एसआयटीकडे वर्ग केला. मात्र या घटनेला नऊ दिवस उलटूनही एसआयटीने अद्याप वामन म्हात्रेला जबाब घेण्यासाठीही बोलावले नाही. त्यामुळे वामन म्हात्रे मोकाट असून एसआयटीही राजकीय दबावाखाली आहे काय, असा संतप्त सवाल बदलापूरकरांकडून केला जात आहे.
म्हात्रेची दबंगगिरी
बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराला अडवून म्हात्रे याने तू अशा बातम्या करतेस जणू काही तुझ्यावरच बलात्कार झाला आहे, अशी मुजोरी केली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर वामन म्हात्रेविरोधात विनयभंग आणि अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला. न्यायालयानेही वामन म्हात्रेला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही टिपणी मीडियासमोर करण्यास मनाई केली होती. तरीही म्हात्रेची दडपशाही आणि दबंगगिरी काही कमी झालेली नाही. ‘जंगलात राहून वाघाशी आणि बदलापुरात राहून माझ्याशी वैर नाही घ्यायचं!’ अशा आशयाचे फलक वामन म्हात्रेच्या कार्यकर्त्यांनी शहरात लावले आहेत.
जंगलात राहून वाघाशी आणि बदलापूरात राहुन माझ्याशी वेट नाही घ्यायचं..!
शाळेतील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार होऊनही संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास मिंधे सरकार हात आखडता घेत असल्याचे या प्रकरणात दिसून आले आहे. पीडितेचे व कुटुंबाचे नाव जाहीर करू नका, असे न्यायालयाने बजावूनदेखील मिंध्यांच्या वामन म्हात्रेने एफआयआरच व्हायरल करून अधिक बदनामी केली आहे. त्यामुळे एफआयआरची कॉपी व्हायरल करणाऱ्या वामन म्हात्रेविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करावा, अशी लेखी मागणी पीडितेच्या आईने केली. म्हात्रे याने एफआयआर कॉपी व्हायरल केल्याचे पुरावेही दिले. त्यानंतर पोलिसांनी हे सर्व प्रकरण एसआयटीकडे वर्ग केले. या घटनेला आज नऊ दिवस पूर्ण झाले. तरीही एसआयटीने अद्यापि वामन म्हात्रेला जबाब घेण्यासाठी बोलावले नाही. राजकीय दबावापोटीच मिंध्यांच्या म्हात्रेला पोलीस आणि एसआयटीही पाठीशी घालत असल्याने संताप व्यक्त होत आहे.