क्लासिक- मिडनाइट्स चिल्ड्रन

>> सौरभ सद्योजात

सलमान रश्दी यांची ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ ही केवळ एक कादंबरी नसून वैयक्तिक आणि राष्ट्रीय घटनांना एकत्र गुंफू पाहणारी स्वातंत्र्योत्तर हिंदुस्थानच्या जडणघडणीची महाकथाच आहे. 1981 साली तिला मानाचं बुकर पारितोषिक आणि तद्नंतर ‘बुकर ऑफ बुकर्स’ हा अतिशय प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाला. ही कादंबरी मिथकं, ऐतिहासिक घटना आणि वैयक्तिक अनुभवांचा सुरेख समन्वय साधते. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेपासून स्वातंत्र्य प्राप्त केलेला हिंदुस्थान आणि स्वातंत्र्याच्या क्षणी मध्यरात्री जन्माला आलेली काही पात्रं यांनी या लेखनाचा पैस व्यापलेला आहे.

जादुई वास्तववाद या पद्धतीच्या लेखन प्रकारावर उभी असलेली ही देखणी कादंबरी अनेक घटना, भावना आणि पात्रांच्या ठायी दडलेले आवाज अगदी कल्पकतेने मांडते. या कादंबरीचा हा एक उल्लेखनीय पैलू म्हणावा लागेल. सलीम सिनाई या मध्यवर्ती नायकाच्या ठायी असलेली टेलिपॅथीची शक्ती आणि त्याद्वारे त्याच्याप्रमाणेच मध्यरात्री जन्माला आलेल्या व्यक्तींशी संपर्क करण्याची, त्यांच्या आयुष्याचा गंध समजून घेण्याची ही कथा आहे. इ. एम. फॉस्टर म्हणतात की, मानवी मन हे कथेच्या अर्थाहून अधिक आधी त्या कथेकडे आकृष्ट झालेलं असतं. नंतर कथेत अंतर्भूत असलेले विषय, घटक आणि त्यांनी संकेतांच्या आधारे जे सुचवलं आहे त्याकडे पाहणं असा तो प्रवास असतो. देशाची जडणघडण आणि सलीमचं आयुष्य नियतीने बांधल्याचं दिसतं. त्यांच्यात एक अटळ संबंध आहे, ज्यातून हे कथानक फुलत जातं. त्यामुळे इतिहास आणि खासगी आयुष्य यांचा आंतरसंबंध हा या कथेतला एक ठळक स्वर आहे. 1950 सालच्या दंगली, 71 चे हिंदुस्थान-पाक युद्ध आणि नंतर आणीबाणीचा काळ अशा घटना आणि त्यात सलीमची वेगवेगळ्या क्षमतेत असणारी उपस्थिती यातून हा आंतरसंबंध प्रस्थापित झालेला दिसतो. इतिहास आणि त्यातील घटनांचा आधार घेत अनेक हिंदुस्थानी लेखकांनी उत्कृष्ट दर्जाचं इंग्रजी लिखाण केलं आहे. त्यात खुशवंत सिंह, मनोहर माळगावकर आणि राजा राव अशी काही उदाहरणे देता येतील. रश्दी यांच्या मते इतिहास हेच मुळी एक असत्य आहे आणि राजा राव यांनी ‘कंथापुरा’ या कादंबरीद्वारे काऊंटर हिस्ट्रीच मांडली आहे. त्यामुळे हे दोन लेखक त्याबाबत वेगळेपण राखून आहेत.

या कादंबरीत अधोरेखित होणारा आणखी एक महत्त्वाचा स्वर म्हणजे ‘स्व’ची ओळख होण्यासाठीची धडपड. देशाचं भाग्य घडत-बिघडत असताना सलीमच्या आयुष्यावर त्याचा खचितच परिणाम होतो. त्याच्या वैयक्तिक आठवणी आणि देशाचा इतिहास समांतर पातळीवर चालत राहतो आणि अनेक ठिकाणी या दोहोंच्या मधील सीमारेषा धूसर होत असल्याची जाणवते. सलीम म्हणतो,

‘‘I told you the truth. Memory`s truth, because memory has its own special kind. It selects, eliminates, alters, exaggerates, minimizes, glorifies, and vilifies also; but in the end it creates its own reality, its heterogeneous but usually coherent versions of events; and no sane human being ever trusts someone else`s version more than his own.’’

यांसह देशाबाहेर राहणाऱया आणि देशाची सतत सय ज्याला येते अशा लेखकाच्या या कादंबरीत स्थलांतर हादेखील एक महत्त्वाचा घटक आहे. मुंबई, कश्मीर अशा भागांत घडणारी कथानकं, इथल्या राजकीय व्यवस्थांवर केलेली संयत, पण प्रखर टीका यांतून त्यांच्यात असणारी स्थलांतराची भावना आणि अस्वस्थता आपण टिपू शकतो.

‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ या कादंबरीने रश्दी यांना जगभर पोहोचवलंच, पण त्यासह हिंदुस्थान उपखंडाचा अद्भुत स्वर आणि कथा जगभर पोहोचवली. पण त्यांच्या निर्भीड, स्पष्ट आणि प्रखर लेखनाने त्यांना अडचणींच्या गर्तेतही टाकलं. इंदिरा गांधींना कथानकात ज्या पद्धतीने त्यांचा उल्लेख होतो, ते अजिबात आवडलं नव्हतं. पुढे  Satanic Verses या त्यांच्या लेखनाला इस्लाममधील मूलतत्त्ववाद्यांचा विरोध इतका वाढला की, त्यांचं मस्तक छाटण्याची भाषा झाली. पुस्तकांवर बंदी आली. अगदी मागच्या वर्षापर्यंत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. पण या लेखकाची अंतर्भूत शक्ती अशी की, त्यांनी नुकताच अशा हल्ल्यांबाबत ‘Knife’ नावाचा ग्रंथ लिहिलाय. अशा निर्भीड आणि प्रतिभावान लेखकाची ही देखणी कादंबरी आवर्जून वाचायलाच हवी.

 [email protected]

(लेखक इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आहेत.)