आगळंवेगळं- शिकागो विद्यापीठातील मराठीचे शिक्षण

>> मेघना साने

शिकागो विद्यापीठातील ‘साउथ एशियन लँग्वेजेस अॅण्ड सिव्हिलायझेशन’ या विभागातील मराठी भाषेच्या असि. इन्स्ट्रक्शनल प्रोफेसर डॉ. सुजाता महाजन. एका नामवंत विद्यापीठात आपली मराठी भाषा शिकवाणाऱया डॉ. सुजाता महाजन यांच्या रूपाने अमेरिकेत मराठी शिकू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना एक उत्तम मार्गदर्शिका मिळाली आहे. तसेच शिकागो महाराष्ट्र मंडळाला साहित्यिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारी एक कार्यकर्ती मिळाली आहे.

‘ज्ञान अधिक अधिक वाढू द्या आणि मानवी जीवन समृद्ध होऊ द्या.’ हे बोधवाक्य असलेल्या शिकागो विद्यापीठ, इलिनॉय, अमेरिका येथे मराठी भाषाही शिकवली जाते हे कळल्यावर नवल वाटले नाही. मराठीतील संत साहित्य अभ्यासण्याची इच्छा असलेल्या अमेरिकेतील काही विद्यार्थ्यांची यापूर्वी भेट झालीच होती. संत साहित्याबद्दल तेथील विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव आहे तसेच संतांनी लिहिलेले अभंग, ओव्या, त्यातून होणारे जीवनदर्शन आणि बोध याबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आहे. शिकागो विद्यापीठ सध्या नवशिक्या, मध्यवर्ती आणि प्रगत स्तरांवर चार वर्षांचे मराठी शिक्षण देते. प्रगत स्तर वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या संशोधन गरजेनुसार केले जातात.

शिकागो विद्यापीठात मराठी भाषा शिकविणाऱ्या डॉ. सुजाता महाजन यांनी कथा, काव्य, चरित्र आणि संशोधनपर साहित्य असे विपुल लेखन केले आहे. निरनिराळ्या महाविद्यालयांत मराठीच्या प्राध्यापक म्हणून काम करण्याचा अनुभव असणाऱया डॉ. सुजाता महाजन यांची प्रथम पुण्याला ‘अमेरिकन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन स्टडीज’मध्ये मराठी भाषेच्या इन्चार्ज म्हणून नेमणूक झाली होती. भारतातील विविध भाषा शिकविणाऱया या इन्स्टिटय़ूटमध्ये मराठीचा विभाग त्या सांभाळत होत्या. दहा वर्षे तेथे काम केल्यावर त्यांना एक उत्तम संधी चालून आली. शिकागो विद्यापीठात ‘साउथ एशियन लँग्वेजेस अँड सिव्हिलायझेशन’ या विभागात मराठी भाषेच्या असि. इन्स्ट्रक्शनल प्रोफेसर म्हणून त्यांना ऑफर मिळाली. ही पोस्ट स्वीकारायची तर घरापासून दूर जावे लागणार होते. पण जगातील एका नामवंत विद्यापीठात आपली मराठी भाषा शिकवायला जाण्याचे आकर्षणही तितकेच मोठे होते. त्या विचारांनी त्या रुजू झाल्या आणि शिकागो विद्यापीठाला शिक्षण क्षेत्रातील एक चांगली व्यक्ती या डिपार्टमेंटला मिळाली.

सुजाता मॅडम यांनी पुणे विद्यापीठातून मराठी घेऊन एमए केले आहे, तसेच भाषाशास्त्र घेऊनही एमए केले आहे. भाषाशास्त्र या विषयाची गोडी लागल्याने त्यातच त्यांनी विद्यावाचस्पती ही डिग्री घेतली. मराठी विश्वकोशाच्या भाषाशास्त्र विभागातही त्यांचे योगदान आहे. बीएला असताना त्यांचा ‘भावनिका’ हा तीन-चार ओळींच्या कणिकांचा संग्रह प्रकाशित झाला होता. 1984 साली प्रकाशित झालेल्या या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा लेखनाचा ‘राज्य पुरस्कार’ मिळाला. बारावीत असताना त्यांनी पाच दिवसांत पूर्ण केलेल्या कादंबरीला पुढे ‘रेऊ प्रतिष्ठान’चा लघुकादंबरीसाठीचा पुरस्कारही मिळाला. मानवी नातेसंबंधांवर आधारित ही कादंबरी ‘सीमापार’ या नावाने 1984 साली ‘साहित्य जागर’ या दिवाळी अंकात छापून आली.

डॉ. सुजाता यांनी महाकवी कुवेंपू यांच्या चरित्राचे मराठी भाषेत भाषांतर केले आहे. हे पुस्तक ‘राष्ट्रकवी कुवेंपू प्रतिष्ठान’ने प्रकाशित केले. तसेच अमराठी भाषकांसाठी त्यांनी एक व्याकरणाचे पुस्तकही लिहिले. कथा, कविता, कादंबरी अशा विविध साहित्य प्रकारात लीलया लेखन करणाऱया सुजाता महाजन यांची लेखन कारकीर्द खूप मोठी आहे.

शिकागोमध्ये आल्यावर विद्यापीठीय अध्यापनाशिवाय सुजाता मॅडम तेथील साहित्य क्षेत्रात सामील झाल्या. शिकागो महाराष्ट्र मंडळाच्या सभासद झाल्यावर मंडळाच्या अध्यक्ष उल्का नगरकर यांनी त्यांची आवड पाहून त्यांच्याकडे साहित्य कट्टय़ाची जबाबदारी सोपवली. दर मंगळवारी, उत्तम पुस्तकांचे वाचन, साहित्य चर्चा यांसारखे कार्यक्रम आयोजित करत त्यांनी तेथील रसिकांची आवड फुलवली.  या कार्यक्रमांचा चांगला परिणाम झाला. काही मंडळी स्वत लिहू लागली. मराठी साहित्याचा इतिहास आणि त्याचा मुळापासून गंध लोकांना मिळावा या दृष्टीने सुजाता मॅडम यांनी मराठीतील प्रथम कवयित्री महादाईसापासून अर्वाचीन कवी-कवयित्रींपर्यंत कवितांचा एक पटच सादर केला. साहित्य कट्टय़ाचाच एक भाग होता, ‘बोलका कट्टा’ भारतातून वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावून त्यांची व्याख्याने, सुप्रसिद्ध कवींचे कवितावाचन आणि मुलाखती ऑनलाईन होऊ लागल्या. महाराष्ट्र मंडळाच्या या सर्व उपक्रमांमुळे आणि सुजाता मॅडमच्या योगदानामुळे शिकागोमधील मराठी मंडळी साहित्यात चांगली रमली.

सुजाता यांनी शिकागो विद्यापीठातील अनुभव मला सांगितले. शिकागो विद्यापीठात संशोधन करायला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा विचार स्वतंत्र पातळीवर करावा लागतो. काही विद्यार्थी अमेरिकन असतात. त्यांना बरेचदा देवनागरी लिपी माहीत नसते. मराठीतील काही ध्वनींचे उच्चार त्यांना जमत नाहीत. काही मुले भारतीय वंशाची पण अमेरिकन संस्कारात वाढलेली असतात. त्यांच्या घरात मराठी बोलले जात नाही. या सगळय़ांना लिहायला-वाचायला शिकवावे लागते. काही विद्यार्थी मराठी बोलणारे असतात, पण त्यांना लिहिता वाचता येत नसते. काही विद्यार्थी आपल्या देशातल्या  इतर प्रांतातले असतात, संस्कृती समान असल्याने समान अभिव्यक्तीच्या अनेक खुणा सापडतात आणि तुलनेने मराठी शिकणे थोडे सोपे जाते. या विद्यार्थ्यांना जुने धार्मिक ग्रंथ, अभंग, ओव्या, संतसाहित्यात तसेच ऐतिहासिक पत्रव्यवहारातही रस असतो. सुजाता मॅडम यांच्या काही विद्यार्थ्यांनी मराठीत विद्वत्तापूर्ण लेख लिहिले आहेत,  तर काहींनी वसंत व्याख्यानमालेमध्ये मराठीत व्याख्यानही दिले आहे. डॉ. सुजाता महाजन यांच्या रूपाने अमेरिकेत मराठी शिकू इच्छिणाऱया विद्यार्थ्यांना एक उत्तम मार्गदर्शिका मिळाली आहे. तसेच शिकागो महाराष्ट्र मंडळाला साहित्यिक उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारी एक कार्यकर्ती मिळाली आहे.

[email protected]