सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट तेढ निर्माण करणारी नसते, हायकोर्टाचा निर्वाळा; लोकांनी मेसेज फॉरवर्ड करणे बंद करावे

सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्ट समाजात तेढ निर्माण करणारी नसते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा निर्वाळा देत न्यायालयाने आक्षेपार्ह व्हॉटस्अॅप मेसेज फॉरवर्ड केल्याचा गुन्हा रद्द केला.

अनेकदा मेसेज फॉरवर्ड करण्याआधी तो बघितला जात नाही. तसे न करता मेसेज फॉरवर्ड करणे बंद करायला हवे, असे निरीक्षण न्या. विभा कणकणवाडी व न्या. संतोष चपळगावकर यांनी नोंदवले.

आता प्रत्येकाकडे स्मार्ट पह्न आहेत. व्हॉटस्अॅपसह अन्य मेसेज अॅप प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आहेत. पण प्रत्येकजण टेक्नोसेव्ही नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करणे अंगलट येऊ शकते, असेही खंडपीठाने नमूद केले.

मेसेज फॉरवर्ड केल्याचा ठपका

छत्रपती संभाजी नगर येथील ज्ञानेश्वर वाकळे यांनी ही याचिका केली होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतचा आक्षेपार्ह मेसेज व्हॉटस्अॅप ग्रुपवर फॉरवर्ड केल्याचा वाकळे यांच्यावर आरोप होता. सामाजिक भावना दुखावल्याचा व समाजात तेढ निर्माण केल्याचा गुन्हा वाकळे यांच्याविरोधात नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. खंडपीठाने ही मागणी मान्य केली.