अभियंत्याला 55 लाखांच्या खंडणीसाठी धमकी, आरोपींच्या पोलीस कोठडीत 1 तारखेपर्यंत वाढ

पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला 55 लाखांच्या खंडणीसाठी धमकविल्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत आज वाढ केली. याआधी दिलेली पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने पोलिसांची बाजू ऐपून आरोपींच्या पोलीस कोठडीत 1 तारखेपर्यंत वाढ केली.

गोरेगावातील पालिकेच्या कार्यालयात दुय्यम अभियंता असलेले अधिकारी विभागात अनधिपृत बांधकामावर कारवाई करतात. या अधिकाऱयाला तुम्ही बनावट कागदपत्रांवर भरती झालात, तुमची तक्रार करतो असे आरोपींकडून धमकावले होते. पण कागदपत्रे खरी असल्याने अधिकाऱयाने धमकी देणाऱयांना धुडकावले. यामुळे आरोपींनी पुटुंबीयांचे बरेवाईट करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली. अधिकाऱयाने पोलिसांत तक्रार दिली.  वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुधीर जाधव, अरुण थोरात, मंगेश देसाई, उपनिरीक्षक लेंबे, गवळी यांच्या पथकाने तपास करून प्रताप चौखंदरे अभयराज पटेल, शेखर सकपाळ, आशीष पांडे,  रफिक मुलानी यांना अटक केली.